प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात सुरु असलेल्या मटणदर आंदोलन आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांचे भाव वाढलेत. ही स्थिती असताना आता चक्क बकऱ्या चोरीला जाऊ लागल्यात. कारमधून सात बकऱ्या चोरुन नेणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलीय.
कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारातल्या बकऱ्यांना चोरांमुळे पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरातील बाळू शिंदे हे आपल्या १३ बकऱ्या चारायला कारंडीमळ्यात गेले होते. तिथं आरोपी शिवाजी कुंभार गेला. बाळू शिंदेंच्या तब्येतीची चौकशी करुन त्यांना सर्दीच्या गोळ्या आणण्यासाठी शंभर रुपये दिले. शिंदे गोळ्या आणयला गेल्याची संधी साधून शिवाजीनं साथीदारांच्या मदतीनं सात बकऱ्या कारमध्ये कोंबल्या.
पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला. अवघ्या २४ तासात त्यांनी शिंदे यांच्या सात बकऱ्या शोधून काढल्या. शिवाय तीन आरोपींना कारसह अटक केली. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या मटणाच्या भावामुळे बकरा चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
कांदा महागला तर कांदा चोरीला जाऊ लागला. आता मटण महागल्यावर चोरट्य़ांची बकऱ्यांवर नजर पडलीय. त्यामुळे कोल्हापूरकरांना आपल्या शेळ्यामेढ्यांच्या सुरक्षेसाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे.