मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार असल्याचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेसची यादी रखडल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार लांबल्याचं सांगण्यत येत होतं. पण, आता मात्र हे चित्र स्पष्ट झालं आहे.
३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून दुपारी १ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांच्यी नावं निश्चित न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून अजून नावंच आली नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आल्याचं या भेटीनंतर समोर आलं.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर पार पडलेलल्या हिवाळी अधिवेशनानंतर लागलीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता होती. सोमवारचा दिवस याविषयीच्या अनेक घडामोडींनी परिपूर्ण होता. पण, यामध्येच काँग्रेसकडून मंत्रीपदासाठीची संधी कोणाच्या वाट्याला जाणार हे मात्र अस्पष्टच राहिलं. परिणामी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला.
लांबणीवर पडलेल्या याच विस्तारासाठी आता ३० डिसेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. तेव्हा हा दिवस राज्याच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. 'सामना'च्या वृत्तानुसार मंत्रिमंडल विस्ताराच्या या सत्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री (एकूण १३ मंत्री) आणि काँग्रेसकडून १० मंत्र्यांच्या यात समावेश असेल.