ट्रेकर्स साठी खुशखबर

ॲप द्वारे ट्रेकर्सना मिळणार माहिती, वन्यजीव विभागाचा उपक्रम

Updated: Jul 28, 2022, 10:31 AM IST
ट्रेकर्स साठी खुशखबर  title=

सोनू भिडे, नाशिक- पंधरा दिवसापूर्वी कळसुबाई शिखरावर पर्यटनासाठी जाणाऱ्या दोन पर्यटकांना अंधारात रस्ता न समजल्याने जीव गमवावा लागला होता. तसेच ऐन पावसाळ्यात अनेक पर्यटक पुरामुळे वेगवेगळ्या जागी अडकले होते. दुर्गम भागातील या डोंगर रांगांमध्ये याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वन्यजीव विभाग कामाला लागला. अनोळखी पर्यटकाला अगदी सहजपणे पर्यटन करता यावे दऱ्याखुऱ्यांचा आनंद घेता यावा यासाठी कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. 

राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातून अनेक ट्रेकर्स या परिसरात भेट देतात.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वन्यजीव विभाग यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करणार आहे. या ॲपद्वारे पर्यटकांना अभयारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाइन ब्लॅक स्पॉट, हॉटेल्स आणि ट्रेकिंगची माहिती मिळणे सोपे होणार आहे. 

हरिश्चंद्रगड
हरिशचंद्रगड हा प्राचीन आहे. स्थानिक कथांच्या माध्यमातून किल्ल्याचा संबंध राजा हरिश्चंद्राशी जोडला जातो. १७४७ मध्ये हरिशचंद्रगड मराठ्यांनी जिंकला आणि किल्ला आदिवासी महादेव कोळी समाजातील कृष्णाजी शिंदे यांच्याकडे दिला. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे होते इस १८१८ मध्ये ब्रिटिशांनी किल्ला जिंकून घेतला व किल्ल्यावरील वास्तू नष्ट केल्या. 

हरिश्चंद्रगड हे ट्रेकर्सचे सर्वात आवडते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. हा गड पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून ४६७० फूट उंच आहे. या गडावर चढताना अभयारण्यातून जावे लागते. या जंगलात अनेक नैसर्गिक वनस्पती आहेत. हरिशचंद्रगडावरचे ट्रेकिंग प्रवास रोमांचक असा आहे. 

कळसुबाई शिखर
कळसुबाई नावाची एक मुलगी डोंगरात राहत होती. या मुलीने गावातील जनावरे आणि नागरिकांना बरे केले होते. एक दिवस ती शिखरावर गेली आणि परत आलीच नाही यामुळे या पर्वताला कळसुबाई शिखर म्हणून ओळख मिळाली. जवळचे गावकरी आजही शिखरावर असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. 

महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. कळसूबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची जमिनीपासून ५४०० फुट आहे. 

असा असेल ॲप
या अॅपमध्ये कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. अभयारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाइन ब्लॅक स्पॉट, जैवविविधता, पर्यटनस्थळे, नियमावली, हॉटेल्स आणि ट्रेकिंगची माहिती मिळणार आहे. तसेच गड, किल्ले व इतर मार्गांचे तीन गटांत वर्गीकरण करण्यात येईल. खडतर मार्गासाठी लाल, मध्यम मार्गासाठी पिवळा तर सोयीस्कर मार्गासाठी हिरवा रंग असणार आहे. छोट्या पायवाटा तसेच अवघड मार्ग ची माहिती देणारी यंत्रणा यामध्ये उपलब्ध असणार आहे. परिसरातील गाईड , विविध आपत्कालीन पोलीस आणि स्थानिकांचे संपर्क तसेच हेल्पलाइन नंबर सुद्धा यामध्ये समाविष्ट असतील.