गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार; भाजप खासदाराने वर्तवली भविष्यवाणी

पुण्यातील भाजप खासदाराने भविष्यवाणी वर्तवली आहे. या खासदार महोदयांनी चक्क गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

Updated: Dec 16, 2017, 02:15 PM IST
गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार; भाजप खासदाराने वर्तवली भविष्यवाणी title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : गुजरात विधानसभेमध्ये भाजप पुन्हा एकदा मुसांडी मारेल असा विश्वास भाजप आणि एक्झिट पोलचे अंदाज वर्तवत आहेत. मात्र, पुण्यातील भाजप खासदाराने मात्र भलतीच भविष्यवाणी वर्तवली आहे. या खासदार महोदयांनी चक्क गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे.

... तर, तो फक्त मोदींचा करिश्मा

खासदार संजय काकडे असे या खासदार महोदयांचे नाव आहे. काकडे यांनी भाजपला घरचा आहेर देत जोरदार निशाणा साधला आहे. काकडे यांचे म्हणणे असे की, त्यांनी स्वत: करून घेतलेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष असल्याचा त्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीतही तिथे भाजप विजय झाल्यास तो फक्त मोदींचा करिश्मा असणार आहे. काकडे यांनी पुणे महापालिकेत भाजपला ९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावेळी तो खरा ठरला होता. खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरूण मेहेत्रे यांनी. 

पक्षात मोदींविरोधात खदखद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भाजपमधील एक प्रबळ नेते आहेत. मात्र, त्यांच्या नेतृत्वाबद्दल पक्षात मोठी नाराजी पसरत चालली असून, अनेक नेते आता उघडपणे टीका करू लागले आहेत. भाजपमध्ये मोदीं आणि अमित शहा यांच्या विरोधात खदखद आहे. नाना पटोले यांनी मोदींवर टीका करत खासदारकीचा राजीनामा दिला. तर, अभिनेते आणि भाजपचे ज्येष्ट नेते शत्रुघ्न सिन्हांनीही मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच मोदींवर जोरदार निशाणा साधला. हा निशाणा साधताना सिन्हांनी मोदींचा थेट उल्लेख टाळला आहे.

विजयाचे श्रेय तर सर्वच घेतात...

ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधतान शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे की, निवडणुकांत विजय झाल्यावर श्रेय सर्वच जण घेतातल. पण, पराभवाची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल सिन्हांनी उपस्थित केला आहे.