Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आज गुरुवारी पहाटे घडला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा आरक्षण व या घटनेबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते पत्नी व मुलीसोबत घराच्या खाली पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मला सायलेंट करता येऊ शकत नाही, असं म्हणत, जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल, असा इशारा सरकारला दिला आहे.
'मला हल्लेखोरांना आणि त्यासोबतच जरांगेंना प्रश्न विचारायचा आहे की हिच तुमच्या शांततेची व्याख्या आहे का. मला सायलेंट करता येऊ शकत नाही. मी या भारताचे जे पिलर असतात 50 टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाची आणि घामाचे नुकसान तुम्ही केले. यापूर्वी 35 पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण करण्यात आली. त्यानंतर मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जयश्री पाटील यांनाही उचलून घेऊन जाण्याच्या धमक्या दिल्या आहेत', असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे
'काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माझ्यासमोरच पोलीस आयुक्तांना फोन केला होता. त्यानंतर एका कॅबिनेट मिनिस्टरनंही यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. याचाच अर्थ पोलिसांनाही याबाबत माहिती होते. आज पोलिसांसमोरच त्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली. ते इमारतीतील माझ्या घरी येण्याचाही प्रयत्न करत होते,' असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
'जरांगे तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटीत घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हे सांगायचं आहे की, बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांच्या मनात विचार येईल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवंतांची तोडमोड केली जाऊ शकते, असंही त्यांनी पुढे नमुद केलं आहे.
'काम माझ्या घरासमोर येऊन रेकी करण्यात आली. हे षडयंत्र आहे. पण मी थांबणार नाही. महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेल, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल,' असा इशारा सदावर्तेंनी दिला आहे.
'जरांगे, पाणी घेऊन उपवास नसतो, सलाइन घेऊन उपवास नसतो. मला हेच कळत नाही हीच आहे का मागसलेपणाची व्याख्या हेच आहे का मागासलेपणा,' अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.