Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे (Maharashtra Corona Update). 24 तासात राज्यात 248 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झाले आहे. तर, तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मास्क वापरण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 1.82% आहे. राज्यात एकूण 3532 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
महाराष्ट्रात 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो. महापालिका स्तरावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. घाबरण्याचे कारण नाही.
यात्रा, उरूस सुरु होतील. जोखमीचे पेशंट असतील यांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे. जाताना मास्क वापरा. जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहिल. पर्यटन, लग्न, यात्रेत जाताना काळजी घेऊन जावे. नवा व्हेरियंट सहा जिल्ह्यात वाढत आहे. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात कोरोना रुग्ण सक्रीय आहेत. सध्या राज्यात मास्क वापरण्याची सक्ती नाही असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे. वर्षभरात फक्त 15 टक्के मुंबईकरांनी घेतला कोरोना लसीचा बूस्टर डोस. लशीची दुसरी मात्रा आणि बुस्टर डोस घेण्याच आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल आहे. त्यामुळे लशीची दुसरी मात्रा आणि प्रिकॉशन डोस घेण्याचं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागानं केले आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एकाच दिवसात 3 हजार 641 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोरोना रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या देशात 20219 सक्रिय रुग्ण आहेत.