पूरग्रस्तांच्या मदतीवर कोण मारतंय डल्ला?

कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हा ग्राऊंड रिपोर्ट...

Updated: Aug 16, 2019, 07:15 PM IST
पूरग्रस्तांच्या मदतीवर कोण मारतंय डल्ला? title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागातील पूर ओसरला मात्र शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर आणि बस्तवाड या तीन गावांना १२ दिवसांनंतरही पुराचा वेढा आहे. शिरोळच्या ५२ पैकी ४३ गावं पुरानं बाधित झाली होती. तीन गावांचा अपवाद वगळता रस्ते मार्गाने मदत करण्यात येतेय. गावाबाहेर पडलेले लोक घरी 

परतण्यास सुरुवात झालीय. मात्र आता गावांमध्ये स्वच्छतेचं आव्हान आहे. दरम्यान, महापुरामुळं बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत मिळण्याऐवजी ती भलत्याच लोकांना मिळत असल्याचं समोर आलंय. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्याच खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

सरकारी मदत पूरग्रस्त भागात आली मात्र ती आपल्यापर्यंत पोहचलीच नसल्याची तक्रार काही पूरग्रस्तांनी केलाय. पुरामुळे राखरांगोळी झालेल्या या 'रांगोळी' नावाच्या गावात अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरलंय आणि संसार उद्ध्वस्त झालाय त्यांना आर्थिक मदतीपासून दूर ठेवण्यात येतंय. 

पुराचं पाणी घरात शिरलेल्या कुटुंबीयांना रोख ५ हजार आणि बँक खात्यावर ५ हजार अशी १० हजारांची मदत राज्य सरकार देत आहे. मात्र गावपातळीवर सरकारच्या या योजनेचा बोऱ्या वाजलाय. ग्रामसेवक आणि तलाठी यांनी बनवलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत खऱ्या लाभार्थींना दूर ठेवून ज्यांच्या उंबरठ्यालाही पाणी शिवलेलं नाही त्यांनीच मदत लाटल्याची तक्रार स्थानिक युवक भूषण मोरे यांनी केलीय. 

गावातले पुढारी आणि त्यांचे सगेसोयरेच या आर्थिक मदतीवर डल्ला मारत असल्याचा आरोप पूरग्रस्त करत आहेत. ज्यांचा संसार या पुरात वाहून गेला त्यांना मात्र १० हजारांच्या मदतीसाठी तलाठ्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.  

पूरग्रस्त संकटात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार गावांमध्ये सुरू आहे.  खऱ्या पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी पूरग्रस्तांची यादी बनवताना प्रशासनानं गावातल्या  पुढाऱ्यांना  बाजूला ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर रांगोळी गावासारखी इतर गावांमध्येही मदतीची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही.