नांदेड : एकीकडे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जात असताना केवळ एका दिवसाच्या चिमुरडीला कचऱ्यात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय. इतकंच नाही तर या चिमुरडीला मारून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही समोर येतंय. काही संवेदनशील नागरिकांना ही चिमुरडी जखमी अवस्थेत सापडली. एका दिवसाच्या चिमुरड्या जीवाला इतकी अघोरी शिक्षा कशासाठी? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
नांदेड शहरातील एका कचराकुंडीशेजारी हे स्त्री जातीचे बाळ जखमी अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं. काही स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर त्यांनी या बाळाला ताब्यात घेतलं.
स्थानिकांनी बाळाला तत्काळ श्यामनगर येथील रुग्णालयात दाखल केले. या बाळाच्या मानेवर ५ ते ६ सेंटीमीटर जखम आहे. त्यामुळेच, बाळाला ठार मारण्याचा प्रयत्न असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून ही 'नकोशी' बचावलीय. बाळ अत्यवस्थ असल्याने पुढील त्याला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बाळावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटलंय.