सतीष मोहिते, झी मीडिया
नांदेडः शेतकरी नवरा नको गं बाई असं म्हणत नाकं मुरडणाऱ्या मुलींसमोर एका उच्च शिक्षित तरुणीने नवा आदर्श घालून दिला आहे. सध्या नोकरीवाला आणि शहरात राहणाऱ्या मुलांनाच मुली लग्नासाठी पसंती देताहेत. समाजात हे चित्र असताना एका उच्च शिक्षित तरुणीने मात्र शेतकरी नवराच हवा, असा हट्ट धरला होता. अखेर वडिलांनीही लेकीच्या हट्टापुढे झुकत तिच्यासाठी शेतकरी दादला निवडला आहे. (Girl Wants To Marry With Farmer In Nanded)
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावातील वैष्णवी कदम. वैष्णवीही उच्च शिक्षित आहे. तिच्यासाठी मोठ्या शहरातून चांगली स्थळे स्वतःहून चालून येत होती. मात्र तिने या स्थळांना नकार दिला व मला शेतकरी नवराच हवाय असा हट्ट वडिलांकडे धरला. वैष्णवी ही आई-वडिलांची एकुलती एक लेक आहे. वडिलांनी मोठ्या लाडा-कोडात तिला वाढवले आहे. तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिले. वैष्णवीने एम.ए अन इकोनॉमिक्स ( MA Economics) आणि एमएसडब्लू पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले आहे. ती सध्या गोदावरी अर्बन या खासगी बँकेत नोकरी करतेय. उच्चशिक्षित आणि बँकेत चांगल्या पगारावर नोकरीला असल्याने वैष्णवीला अनेक स्थळे येत होती.
मोठया शहरातून आणि चांगली खाजगी नोकरी करणाऱ्या मुलांची स्थळ येत होती. मात्र वैष्णवीने मला शेतकरी नवराच हवा असा हट्ट दरला. लेकीचा हा हट्ट वडिलांनीदेखील मोठ्या अभिमानाने पूर्ण केला. लेकीसाठी युवा शेतकऱ्यांचे स्थळ ते शोधत राहिले. अखेर तिच्या वडिलांनी चांगलं स्थळ शोधलेच. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नितीन पाटील या शेतकरी युवकाशी वैष्णवीचं लग्न जमल आहे.
नितीन पाटील असं वैष्णवीच्या होणार्या नवऱ्याचे नाव असून त्यांची पंधरा एकर शेती आहे. आपल्या वडिलांनी शेती करून वाढवले, शिकवले त्यामुळे शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल मनात खूप आदर असल्याचे वैष्णवीने सांगितले. त्यामुळेच तिने शेतकरी नवरा पाहिजे असा हट्ट धरला. रविवारी 9 जुलै रोजी नितीनसोबत तिचा विवाह होणार आहे. नोकरी कधीच नेहमीसाठी नसते, शिवाय नोकरीत सीमित उत्पन्न असते. शेती ही नेहमीसाठी असते. शेतीची बरोबरी कुणी करू शकत नाही. असे वैष्णवीचे वडील दिगांबर कदम यांनी म्हटलं आहे. त्यांनाही आपल्या लेकीच्या निर्णायाचा अभिमान आहे.