हिंगणघाट : एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जाळण्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट येथून समोर आला होता. गेली ७ दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर पीडितेला अपयश आले असून आज तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेबद्दल समाजातून चीड आणि संताप व्यक्त होत आहे. आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका पीडितेच्या नातेवाईकांनी घेत ठिय्या आंदोलन केले आहे. दरम्यान नातेवाईकांना यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.
पीडितेच्या नातेवाईकांच्या सगळ्या मागण्या मान्य करु असे आश्वासन नातेवाईकांना दिले. पालकमंत्री सुनील केदारांनी यासंदर्भात मध्यस्थी केली.
दरम्यान पीडितेच्या भावाला राज्यशासनातर्फे नोकरी दिली जाईल असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.
सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. ३ फेब्रुवारी सोमवारची 'ती' सकाळ. ही शिक्षिका कामवर जात असताना आरोपी विकेश नगराळेने भर रस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळलं. पण पीडित शिक्षिकेची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपुष्टात आली आहे.
प्रेमभंगातून आरोपी विकेश नगराळेने पीडित शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडिता जवळपास ४० टक्के भाजली होती. मात्र अन्ननलिका, श्वसननलिकाच जळल्यामुळे तिचा जगण्याचा संघर्ष सुरु होता. डॉक्टरांनीही तिला जगवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तरीही सगळ्यांच्याच प्रयत्नांना अपयश आलं.
आपल्या पोटच्या मुलीवर त्या नराधमाच्या कृत्याने ही वेळ आल्याने आधीच बिथरून गेलेल्या आईवडिलांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे.
जळीतकांडाची घटना घडल्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त झाला. मोर्चा निघाले. आरोप झाले. मात्र यातून त्या मुलीचे प्राण कोणीच वाचवू शकलं नाही. मुळात अशा घटना घडणार नाहीत. किंवा अशा घटना घडवण्याचं धाडसंच कोणी करणार नाही असा वचक, असे कायदे झाले तर पुन्हा अशी वेळ कोणत्याही पीडितेवर येणार नाही. कारण राज्य...शहरं...मुली बदलतात...घटना त्याच त्याच पुन्हा घडतात. ज्या दिवशी ही विकृती थांबेल. त्याच दिवशी या पीडितांना, निर्भयांना खरा न्याय मिळेल.