ठाणे: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह शुक्रवारी मुंब्रा खाडीत सापडला. मनसुख हिरेन यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन यांनी मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यकडे केली होती.
या तक्रारीत विक्रोळी पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे, एनआयए, घाटकोपर पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तापसायंत्रणाकडून वारंवार तेच प्रश्न विचारले जात असून त्यामुळे मानसिक छळ होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्ययाकडे केलेल्या तक्रारीची प्रत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर समोर आली आहे. दरम्यान मनसूक हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत शुक्रवारी दुपारी आढळला. त्या ठिकाणी आता ATS विभाग अधिक तपासासाठी दाखल झाला आहे.
दुसरीकडे मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट जाहीर करा आणि मगच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मनसुख यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
पोस्टमार्टम अहवाल आणि मृत्यूचं कारण आधी जाहीर करा त्यानंतर पोस्टमार्टम करतांना केलेलं चित्रीकरणही आम्हाला दाखवा तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशी संतप्त भूमिका हिरेन यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
मनसुख हरेन यांच्या घरी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि त्यांची टीम पोहचली आहे. हिरेन यांच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा मारहाणीची खुण नसल्याची ठाणे पोलिसांनी माहिती दिली आहे.