मुंबई : शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना प्रत्येकजण याचे श्रेय घेताना दिसत आहे. दरम्यान वेगळा प्रसंग पहायला मिळाला.
भाजपा-शिवसेनेची तुतु-मैमै काही नवी राहिली नाही. एकत्र सत्तेत राहून एकमेकांना आपल्या सोयीनुसार कोपरखळी देणे सर्वांना समजले आहे. शेतकरी कर्जमाफीवरून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सिक्सर मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळलेली पहायला मिळाली.
'कर्जमाफीच्या बँकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री संतापताना दिसले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांमध्ये मी खरा शिवसैनिक पहिला' असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी जळगावात केले आहे. पक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज माफीसाठी सरकारशी शिवसेनेचा संघर्ष कायम राहील, पण सहकारी पक्ष म्हणून सरकारनं कर्जमाफीच्या केलेल्या बोहनीवर आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.
पहिल्याच दिवसाच्या आकडेवारीवरुन मुख्यमंत्री भविष्यात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील हे शिवसेनेला पटतंय असंही गुलाबराव यावेळी म्हणाले.