नाराज असलो तरी काँग्रेसशी एकनिष्ठ - माणिकराव गावित

आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे.  

Updated: Mar 29, 2019, 05:07 PM IST
नाराज असलो तरी काँग्रेसशी एकनिष्ठ - माणिकराव गावित title=

नंदूरबार : मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे. नवापूर येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केला आहे. दुसऱ्या कोणताही पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, नंदूरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत असताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्‍याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आपण नाराज असल्याचे गावित यानी सांगत भरत गावीत यांचा उमेदवारीसाठी विचार व्हायला हवा होता, अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाने आपल्याला दोनदा मंत्रिपदाचा सन्मान दिला असून नऊ वेळा खासदार बनण्याची संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे गावित यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांचे बंड हे भाजपच्या सांगण्यावरून असल्याची चर्चा होत असतानाच, भरत गावीत यांनी मात्र या सर्व चर्चां चुकिच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे भरत गावित यांनी स्पष्ट केला आहे. विशेष म्हणजे आपण भाजपच्या संपर्कात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केला आहे.  माणिकराव गावित यांच्या निष्ठेचे फलित मिळायला पाहिजे होते, मात्र पक्षाने आपला विचार न करता उमेदवारी जाहीर केली, असा आरोप भरत गावित यांनी केला आहे. आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

नाराज भरत गावित यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास काँग्रेस  बरोबरच भाजपच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरेल. ३०  तारखेच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारी बद्दलचे चित्र स्पष्ट होईल. तथापि महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेस पक्षाला खिंडार पडत असतानाच नंदूरबार जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, माणिकराव गावित यांनी आपण काँग्रेसमध्ये असल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेसला येथे धोका नसल्याचे दिसत आहे. परंतु उद्याच्या मेळाव्यात काय निर्णय होणार यावरच पुढची गणिते ठरणार आहेत.