ठाणे : बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी पोलिसांनी भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला अटक केलीय. हे प्रकरण सौम्यपणे हाताळावे यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा आता डोंबिवलीत सुरू झाली आहे. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानं आता पोलिसांनी पुन्हा पोलिस कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. डोंबिवलीतल्या धनंजय कुलकर्णीच्या हाऊस ऑफ फॅशन या दुकानात शस्त्रसाठा सापडला होता. हा शस्त्रसाठा विध्वंस घडवण्यासाठी आणला होता का, असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडलेला असतानाच नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. सरकारमधील एका मंत्र्याने कारवाई सौम्य करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याची चर्चा डोंबिवलीत सुरू झाली आहे.
आरोपी धनंजय कुलकर्णीला पोलिसांनी जेव्हा कोर्टात हजर केले तेव्हा पोलिसांना त्याच्या चौकशीसाठी कोठडीही मागावीशी वाटली नाही. कोर्टाने कुलकर्णीला न्यायालयीन कोठडीत पाठवले असून त्याला लवकरच जामीन मिळण्याची शक्यता आहे. डोंबिवलीतल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी आरोपी धनंजय कुलकर्णी आणि त्याच्याशी संबंधित आरोपींची भीतीने गाळण उडणे अपेक्षित होते. इथं आरोपीला पकडून पोलीस घाबरल्यासारखे का वागतायत असे कोडे डोंबिवलीकरांना पडले आहे.