सिंधुदूर्गात वाळू माफियांची दहशत, मालवणच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

कारवाईत पकडलेला डंपर वाळू माफियांनी पळवून नेला.

Updated: Jan 17, 2019, 01:51 PM IST
सिंधुदूर्गात वाळू माफियांची दहशत, मालवणच्या तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न title=

मालवण - अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करण्यास गेलेले मालवणचे तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू माफियांकडून डंपर चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कारवाईत पकडलेला डंपर वाळू माफियांनी पळवून नेला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या कारवाईत वाळू माफियांच्या चार मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दरम्यान या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. जोपर्यंत संबंधितांवर अटकेची कारवाई होत नाही. तोपर्यंत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील यांनी दिला आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात याआधीही वाळू माफियांच्या गुंडगिरीला सरकारी अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. तरीही वाळू माफिया कुणालाही न जुमानता या परिसरात अनधिकृतपणे वाळूचे उत्खनन करून त्याची बेकायदा वाहतूक करीत असतात. बुधवारी रात्री घडलेल्या घटनेवरून अद्याप वाळू माफियांना पोलिसांची जरब बसल्याचे दिसत नाही. यापुढे पोलिस वाळू माफियांविरोधात कडक कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.