Nanded Tapovan Express : प्रवाशांसाठी रेल्वेने रिव्हर्स गिअर घातल्याचे कधी आपण ऐकले आहे का.. नाही ना मग अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड जंक्शन स्थानक जवळ धावत्या ट्रेनमधून प्रवासी खाली पडला. प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चक्क 200 मीटर रेल्वे रिवर्स नेण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे गाडीचे लोको पायलेट अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र, या घटनेतील जखमीचे प्राण वाचवण्यात मात्र अपयश आले आहे.
मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमधील प्रवासी रेल्वेमधून खाली पडला. या प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे 200 मीटर रिव्हर्स' नेण्यात आल्याची घटना सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली. लोको पायलट अर्थात ड्रायव्हर आणि गार्ड यांच्या अथक प्रयत्नानंतरही गंभीर जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यात अपयश आले असले तरी दोघांच्या कसोशीच्या प्रयत्नांचे अन्य प्रवाशांनी कौतुक केले आहे.
शनिवारी मुंबईहून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस समिट स्थानक सोडून मनमाडकडे येत असताना चेन खेचल्याने रेल्वे थांबवण्यात आली. लोको पायलट आणि गार्ड यांनी चौकशी केली असता तिसऱ्या डब्यात दरवाजाजवळ उभा असलेला एक प्रवासी रेल्वेखाली पडल्याची माहिती त्यांना अन्य प्रवाशांकडून समजली. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत या प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने पावले उचलत त्याचा शोध घेतला.
रेल्वे थांबलेले ठिकाण आणि प्रवासी पडलेले ठिकाण हे बरेच अंतर असल्याने त्यांनी रेल्वे 200 मीटर रिव्हर्स नेली. दरम्यानच्या मार्गात सिग्नल असल्याने रेल्वे थांववण्यात येऊन जखमीचा शोध घेत त्यास स्ट्रेचरवरून मनमाड स्थानकापर्यंत हलवण्यात आले. तत्पूर्वी मनमाड रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना घटनेची पूर्वकल्पना देण्यात आली. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी तपोवनमागे असणाऱ्या इतर गाड्यांना समिट स्थानकावरच थांबविले होते.
यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचेही सहकार्य घेण्यात आले. जखमी प्रवाशास रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने तपोवन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. दरम्यान या घटनेमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आल्याने लोको पायलट, गार्ड यांच्या प्रयत्नांचे रेल्वेतील अन्य प्रवाशांनी कौतुक होत आहे...