मुंबई : cyclone nisarga निसर्ग वादळाने पालघरलाही तडाखा बसणार असं सांगण्यात आलं होतं. पण, मुळात मात्र या वादळानं दिशा बदलली, अलिबागच्या दिशेनं वादळानं कूच केली आणि वादळ सक्रीय असण्याच्या मुख्य काळात मात्र पालघरवर याचा तसुभरही परिणाम झाल्याचं दिसलं नाही.
असं असलं तरीही दुसऱ्या दिवशी म्हणजेच वादळाची तीव्रता कमी होत असताना आणि त्याचं रुप बदलत असतानाच त्याचे परिणाम मात्र पालघरमध्ये दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहाटेपासूनच या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांसाठी पावसाचा जोर ओसरला. पण, संतताधर मात्र कायमच राहिली. मुसळधार आणि संततधार असं एकंदर चित्र असणाऱ्या पालघरमध्ये पावसामुळं वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.
कसं बदललं निसर्ग चक्रीवादळाचं स्वरुप?
अरबी समुद्रात अतिशय कमी वेळात तयार झालेलं हे चक्रीवादळ तितक्याच कमी वेळात शमलंही. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे वादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं. ज्यानंतर ताशी १०० ते ११० किलोमीटर इतक्या वेगानं सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. पण, वाऱ्याचा हा वेग काही क्षणांमध्ये मोठ्या फरकानं कमी झाला. पण, तोवर सुरुवाचीलाच अतिशय वेगवान आणि ताकदीच्या वाऱ्याच्या विळख्यात अनेक गोष्टी आल्या. एका क्षणाला अतीश तीव्र झालेलं हे वादळ ज्यावेळी अलिबागच्या किनाऱ्यापासून पुढँ सरकत गेलं तसतसं त्याची तीव्रता कमी होत गेली.
किनारा ओलांडून राज्यात आलेल्या या वादळाचं रुपातंर हे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झालं. परिणामी बहुतांश भागांमध्ये वादळानंतरही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. पालघरमध्ये सुरु असणारी मुसळधारही त्याचाच एक भाग.