India Student Suicide Rate: भारतामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसंदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली असून ही समस्या भविष्यात अधिक भीषण रुप धारण करु शकते याकडे ही आकडेवारी इशारा करत आहे. नव्याने समोर आलेल्या एका अहवालामध्ये, विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण हे लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही अधिक आहे. तसेच एकंदरित होणाऱ्या आत्महत्येंच्या तुलनेत विद्यार्थी आहत्महत्येचं प्रमाण अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या डेटा, 'विद्यार्थी आत्महत्या : भारतभरातील साथ' या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आला आहे. बुधवारी आयसी थ्री कॉन्फरन्स अँड एक्सपो 2024 मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. वार्षिक स्तरावर विचार केल्यास, मागील वर्षभरामध्ये आत्महत्येचं प्रमाण 2 टक्क्यांनी वाढलं आहे. याच कालावधीमध्ये विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण मात्र 4 टक्क्यांनी वाढलं आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी आत्महत्येच्या सर्वच प्रकरणांची नोंद होत नसतानाही ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. "मागील दोन दशकांमध्ये, विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण वार्षिक आकडेवारीनुसार 4 टक्क्यांनी वाढलं आहे. हे प्रमाण आत्महत्येसंदर्भातील राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. 2022 मध्ये आत्महत्ये केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 53 टक्के विद्यार्थी हे पुरुष होते. 2021 ते 2022 दरम्यान मुलांनी (पुरुषांनी) आत्महत्या करण्याचं प्रमाण 6 टक्क्यांनी कमी झालं आहे. तर विद्यार्थिनींच्या आत्महत्येचं प्रमाण 7 टक्क्यांनी वाढलं आहे," असं आयसी थ्री इंस्टीट्यूटने माहिती गोळा केलेल्या या अहवालामध्ये म्हटलं आहे.
"लोकसंख्या वाढीचा दर आणि एकंदरित आत्महत्येच्या आकडेवारीपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. मागील 10 वर्षांमध्ये 0 ते 24 वयोगटातील लोकसंख्या 582 मिलियनवरुन 581 मिलियनपर्यंत कमी झाली. तर याच कालावधीमध्ये विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण 6654 वरुन 13044 वर पोहोचलं आहे," असं अहवालात म्हटलं आहे.
आयसी थ्री इंस्टीट्यूटच्या विद्यार्थी आत्महत्येसंदर्भातील अहवालामध्ये भारतामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. या राज्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच जास्त आहे. देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या संख्येच्या एक तृतीयांश आत्महत्या या तीन राज्यांमध्ये होतात.
विद्यार्थी आहत्मत्यांचा विचार केल्यास दाक्षिणात्य राज्यं आणि केंद्रशाशित प्रदेशांमधील आत्महत्या या एकूण आकडेवारीच्या 29 टक्के आहेत. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी जातात. मात्र हे राज्य विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत 10 व्या स्थानी आहे. यावरुनच या राज्यात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या ताणाचा अंदाज बांधता येतो.
आयसी थ्री इंस्टीट्यूट ही संस्था जगभरातील विद्यार्थ्यांना आणि शाळांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचं काम करते. खास करुन विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये ते कसे हातभार लावू शकतात यासंदर्भात मार्गदर्शन केलं जातं.