परभणी: नवीन वर्षात राज्यातील नऊ जिल्ह्यांसाठी सैन्यभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ४ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ६५ हजार उमेदवारांचे ऑनलान अर्ज आले आहेत. मात्र, भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू आहे. दहा दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत रोज तीन जिल्ह्याच्या सात हजार उमेदवारांना येथे पाचारण करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी परभणी, बुलढाणा, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील उमेदवारांना येथे बोलावण्यात आले होते.
हजारोंच्या संख्येने हे तरुण परीक्षार्थी येथे रात्री नऊ वाजल्यापासूनच दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया ही रात्री १२ वाजल्यापासून सुरू झाली. अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची चहापाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे देशाच्या भावी सैनिकांना रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर आणि मैदानात भर थंडीत कुडकुडत उघड्यावरच रात्र काढावी लागली.