सिंचन गैरव्यवहार : अजित पवार प्रथमदर्शी दोषी, सुनावणी पुढे ढकलली

सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

Updated: Nov 28, 2018, 08:57 PM IST
सिंचन गैरव्यवहार : अजित पवार प्रथमदर्शी दोषी, सुनावणी पुढे ढकलली title=

नागपूर : सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एसीबीने कालच याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं होते. यात तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार प्रथमदर्शी दोषी असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष लागले असताना न्यायमूर्ती आर. के. देशपांडे आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाने हे प्रकरण दुसऱ्या पीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होण्याची शक्यता आहे. 

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तसा दावा एसीबीच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय. एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तसा दावा केला आहे.

या दाव्यात तांत्रिक मंजुरी नसतानाच तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवारांनी सिंचनाचे कंत्राट दिल्य़ाचं या प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. २७ पानांचं हे प्रतिज्ञापत्रात असून यात अजित पवारांवरच ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे अजित पवारांवर काय कारवाई होणार याबाबत आता चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अजित पवारांवरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहेत.