Shahid Jawan : अमर रहे, अमर रहे... सांगलीच्या शहीद सुपुत्राला अखेरचा निरोप; पंचक्रोशीत शोककळा

सीमेवर तैनात असलेल्या सांगली जिल्ह्यातील सुपुत्राला देशाचे संरक्षण करताना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळ पसरली आहे.  

Updated: Jan 21, 2023, 05:21 PM IST
Shahid Jawan : अमर रहे, अमर रहे... सांगलीच्या शहीद सुपुत्राला अखेरचा निरोप; पंचक्रोशीत शोककळा  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया सांगली : बॉर्डरवर शहीद झालेले सांगली (Sangali) जिल्ह्यातील खानापुरचे सुपुत्र शहीद जयसिंग भगत (Shaheed Jai Singh Bhagat) अनंतात विलीन झाले आहेत.  शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. साश्रुनयनांनी या शहीद जवानाला (Shahid Jawan )अखेरचा निरोप देण्यात आला. या घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 

सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र असलेले आणि भारतीय लष्करातील शहीद नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर यांना सीमेवर वीरमरण आले. खानापूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. भारत माता की जय आणि वंदे मातरम, अमर रहे अमर रहे ,अशा जयघोषाने प्रत्येकाचा उर अभिमानाने भरुन आला. शहीद नायब सुभेदार जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप देण्यात आला, हजारोंचा जनसमुदाय व राजकीय नेत्यांसह अधिकारी त्यांच्या अंत्ययत्रेत सहभागी झाले.

सियाचीन येथे बॉर्डरवर कर्तव्यावर असताना प्रचंड हिमवर्षावामुळे जयसिंग भगत हे शहीद झाले आहेत. पहाटे शहिद भगत यांचे पार्थिव विमानाने लडाख हुन पुण्यात पोहचले. त्यानंतर सकाळी लष्कराच्या वाहनातून शहीद भगत यांच्या पार्थिव खानापूर मध्ये पोहचले.

शहीद जवान जयसिंग शंकरराव भगत यांचे पार्थिव घरासमोर शेवटचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर शहरातून अंत्ययात्रा काढत शासकीय इतमामात शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.

भारत माता की जय, वीर जवान अमर रहे,अशा घोषणा देण्यात येत होत्या. या अंत्यसंस्कारासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह राजकीय नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती. तसेच शासकीय अधिकारी देखील अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले होते. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद जयसिंग भगत यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,एक मुलगा, वडील,भाऊ असा परिवार आहे. भगत  यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.