प्रेमी जोडप्याला मारहाण : आरोपींचं वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय

मारहाणीचा राज्यभरातून तीव्र निषेध 

Updated: Feb 1, 2020, 04:50 PM IST
प्रेमी जोडप्याला मारहाण : आरोपींचं वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय  title=

जालना : जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथे प्रेमी जोडप्याला झालेल्या मारहाणीचा राज्यभरातून तीव्र निषेध केला जातोय. जालन्यातल्या गोंदेगाव शिवारात ही घटना घडली. टोळक्याकडून प्रेमीयुगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतो आहे. जालना जिल्हा वकील संघाने देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. प्रेमी जोडप्याला मारहाण करणाऱ्या आरोपींचं वकीलपत्र घ्यायचं नाही अशा प्रकारचा ठराव घेण्याच्या तयारीत असल्याचं जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

याप्रकरणी उपविभागीय पोलिसांनी तपास सुरू केला असून एकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. हे प्रेमीयुगुल बुलढाण्यातील असल्याची माहिती आहे. ते जालन्यामध्ये गोंदेगाव शिवारात आले असताना इथल्या स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. 

नागरिकांनी कायदा हातात घेणं अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी दिलीय. तर प्रेमी युगुलाला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करणं हे कृत्य समर्थनीय नसून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 

जालना जिल्ह्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार गेल्या २ महिन्यांपासून वाढू लागल्या आहेत. पोलिसांचा कुठलाही जरब राहिला नसल्याची टीका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलीय. तर जालना जिल्ह्यातली प्रेमीयुगुलाला मारहाणीची घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 

दरम्यान या घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणार असल्याचं अनिल देशमुख यांनी ट्टिवटरद्वारे स्पष्ट केलंय. तर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंनी या घटनेचा निषेध केला आहे.