जळगावचा गड भाजपने राखला, रंजना पाटील अध्यक्ष

 जिल्हा परिषद निवडणुकीत 35- 30 जागांनी भाजपचा विजय झाला आहे. 

Updated: Jan 3, 2020, 03:54 PM IST
जळगावचा गड भाजपने राखला, रंजना पाटील अध्यक्ष title=

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेचा निकाल अखेर लागला असून पुन्हा एकदा भाजपाने इथे आपले वर्चस्व राखले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत 35- 30 जागांनी भाजपचा विजय झाला आहे. गेली २० वर्षे येथे भाजपची सत्ता आहे. पण भाजपला सत्तेपासून पायउतार करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चंग बांधला होता. यात त्यांना अपयश आले. 

आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. महाजन खडसे यांच्या मनोमिलनाने भाजप चे वर्चस्व कायम राहील्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी पिछाडीवर असून भाजप रंजना प्रल्हाद पाटील या जिल्हाध्यक्ष असणार आहेत. 

'खडसे शिवसेनेत ही गंमत'

पाच-सहा जण भाजपच्या संपर्कात आहेत हे खरे आहे का ? असा प्रश्न माध्यमांनी गुलाबरावांना विचारला. तेव्हा हो..हो..खडसे देखील आमच्या संपर्कात असल्याचे मी म्हणालो होतो असे गुलाबरावांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. मी गंमतीमध्ये बोललो पण मीडियाने तो विषय उचलून धरल्या असे गुलाबराव आपल्याशी बोलल्याचे देखील महाजन यांनी सांगितले.

'नाराजीबाबत चर्चा नाही'

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही खडसे म्हणाले. भाजपात नाराजीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.