योगेश खरे, झी २४ तास | जळगावच्या शाळांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा सुरु असल्याचा आरोप आहे. बोगस शिक्षकभरती करुन, बोगस संचमान्यता दाखवून कोट्यवधींचा मलिदा संस्थाचालक आपल्या खिशात घालत आहेत. दमदाटी करुन शिक्षकांकडूनच वसुली करण्यात येते असा आरोप शिक्षकांनीच केलाय. अमळनेरची शिवाजी हायस्कूल, इथले शिक्षक आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागत आहेत. शिक्षकांची जास्त पदं दाखवून, जादा बोगस विद्यार्थी संख्या दाखवून संस्थाचालकांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय.
2020 मध्ये शाळेचं व्यवस्थापन बदललं. शाळेचा विकास होईल असं इथल्या शिक्षकांना वाटलं. मात्र झालं भलतंच. इथल्या शिक्षकांना पगारांसाठी तिष्ठत राहावं लागलं. काही कर्मचा-यांना विनाअनुदानितवरुन अनुदानितमध्ये वर्ग करण्यात आलं. मात्र हे करताना त्यांच्या पगारातल्या फरकाचा कोट्यवधींचा पैसा संस्थाचालकाने स्वत:च्या खिशात घातल्याचा आरोप केला जातोय.
संस्थाचालक इथंवरच थांबले नाहीत. तर काही शिक्षकांवर दमदाटी करुन त्यांच्याकडून प्रत्येकी 15 लाख वसुल करण्यात आल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप शिवाजी हायस्कूलच्या शिक्षकांनी केलाय. जुन्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दाखवायचं आणि नवीन कर्मचाऱ्यांना आयात करायचं या धोरणातून हा घोटाळा होत असल्याचा आरोप इथल्या शिक्षकांनी केलाय.
एवढंच नाही तर संस्थाचालक शिक्षकांनाही आपल्या घोटाळ्याच्या कामात सहभागी करण्याची धमकी देत असल्याचाही आरोप आहे. या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी काय आहे. याचाही पर्दाफाश झी २४ तास आपल्या इन्व्हेस्टिगेटीव्ह रिपोर्टमधून करणार आहे.