Jalna School Suspicious Material: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या दोन घटना सोमवारी समोर आल्या आहेत. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बांगड्या, हळदी-कुंकू आणि बाहुली सापडली आहे. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्येही असाच प्रकार समोर आला आहे.
जालन्यातील गोंदी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखं कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याच चित्र पहायला मिळत आहे. शालेय व्यवस्थापन समितीने पोलिसांना या प्रकरणामध्ये निवेदन दिल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. गडदे यांनी दिली आहे. गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गामध्ये बांगड्या, हळद-कुंकू वाहिलेली बाहुली शनिवारी आढळून आली. तरी या प्रकरणाची सविस्तर माहिती सोमवारी समोर आली आहे.
वर्गात हळद-कुंकू लावलेली, बांगड्या वाहिलेली बाहुली पहिल्यांदा नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पाहिली. हा सारा नेमका काय प्रकार आहे हे या मुलांना आधी कळलं नाही. मात्र ही बाहुली आणि सर्व पसारा अगदी जवळ जाऊन पाहिल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गातून पळ काढला. त्यानंतर या प्रकरणाची गावभर चर्चा झाली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसापूर्वीच चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने तपास सुरु असून पोलिसांना सदर घटनेची माहिती कळवली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
जालन्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रकार उजेडात आला आहे. येथील एका निर्मनुष्य जागेवर जादूटोण्यासाठी वापरलं जातं तसं सामना सापडलं आहे. लिंबू, बांगड्या, कुंकू, बाहुली, दाबन अन् गव्हाच्या पिठाची गळ्यात मंगळसूत्र असलेल्या मूर्तीसोबत हिरवा कपडा निर्मनुष्य जागेवर सापडला आहे. जिल्ह्यातील खेड आणि उपळा गावच्या शिवावर निर्मनुष्य जागेवर टाकल्या या वस्तुंची सध्या पंचक्रोषीत चर्चा आहे. तर दुसरीकडे उपळा गावातील ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.