Mira-Bhayandar Jellyfish: वातावरणातील बदलामुळं आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांमुळं आणखी एक नवं संकट येऊन ठेपलं आहे. मीरा-भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांवर विचित्र संकट घोंगावत आहे. भाईंदर जवळील उत्तन किनारी पट्ट्यात राहणारे मच्छिमार जेलिफिशच्या आक्रमणामुळं चिंतेत आहेत. जेलीफिशची संख्या वाढल्यामुळं त्याचा थेट मासेमारीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
भाईंदर येथील मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून समुद्रात जेलीफिशचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. जेलीफिशचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. मासेमारीसाठी समुद्रात टाकण्यात आलेल्या जाळी जेलीफिशच्या वजनामुळं खराब होते. जेलीफिशचे वजन खूप असल्याने ते जाळीत अडकल्यानंतर ती जाळी नंतर दुरुस्तही करण्यात येत आहे. जेलिफीशची विक्री करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरात 90 टक्के पाणी असते तसंच, त्यांना मेंदू, रक्त किंवा हाडे नसतात त्यामुळं त्यांना अखाद्य म्हणून पाहिले जाते.
जेलिफिशच्या वाढत्या संख्येमुळं मासेमारीवरही परिणाम झाला आहे. मासळीच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला असून जाळ्यात जेलीफिश अडकल्यानंतर त्यांना सोडून देण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो, असं एका मच्छिमाराने म्हटलं आहे. तसंच, जेलीफिश त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर जळजळ होते. अशा परिस्थितीत त्यांना जाळीतून बाहेर काढणे कठिण जाते.
मासळीची संख्या कमी झाल्यामुळं आधीच तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणारे मच्छिमार कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. जेलीफिशच्या अतिक्रमणामुळं या संकटात अधिक भर पडली आहे. समुद्रात एकदा मासेमारीसाठी गेल्यानंतरचा संपूर्ण प्रवास वाया जातो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांप्रमाणेच सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी केली.
बोटीच्या आकारमानानुसार आणि क्षमतेनुसार खलासी (मदतनीस) आण तांडेल यांच्यासह आठ ते दहा जण एक आठवडा ते दहा दिवस मासेमारीच्या प्रवासासाठी निघतात. मात्र अनेकदा बोटी रिकाम्या हाताने परत येतात. मजुरीच्या खर्चाव्यतिरिक्त प्रवाशासाठी आवश्यक असलेल्या वस्तु, डिझेल आणि इतर पुरवठ्यांचा खर्च वाया जातो. उत्तन, पाली, डोंगरी, भट्टे बंदर आणि चौक यासह गावांमध्ये 750 हून अधिक बोटी आहेत, जे किनारपट्टीच्या पट्ट्यात राहणाऱ्या अनेक लोकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहेत.