कल्याणमधील खुनाचा उलगडा, बापाकडून मुलीचा खून

तो खून मुलीच्या बापानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. 

Updated: Dec 9, 2019, 06:31 PM IST
कल्याणमधील खुनाचा उलगडा, बापाकडून मुलीचा खून

कल्याण : कल्याण स्थानकाजवळ अर्धवट मृतदेह घेऊन जाणाऱ्या इसमाला रिक्षा चालकाने हटकले होते. तो इसम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या घटनेमागचा शोध सुरु होता. अखेर त्या खळबळजनक घटनेचा उलगडा पोलिसांना झाला आहे. तो खून मुलीच्या बापानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. 

या मुलीचे प्रेमसंबध होते आणि ते वडीलांना मान्य नव्हते. त्यामुळेच तिचा खून केल्याचे समोर आले आहे.  आपल्या राहत्या घरी त्यांनी मुलीची हत्या केली. या गृहस्थाला चार मुली आहेत. त्यातील ही मुलगी मोठी होती.

वरचा भाग टिटवाळ्याला एका ठिकाणी गाडला. तर मृतदेहाचा खालचा भाग तो कल्याण स्थानकावरुन नेत असताना हा प्रकार उघडकीस आला. कसलाही ठोस पुरावा हाती नसताना केवळ २४ तासांच्या आत कल्याण पोलिसांनी हा शोध पूर्ण केला आहे.

अधर्वट शरीराचा मृतदेह स्थानकाजवळ ठेवून पळ काढण्याचा प्रयत्न मुलीच्या बापाने केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याण रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार समोर आला.  कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रिक्षाचालकाने त्या इसमाला हटकले. त्या इसमाच्या हातामध्ये एक बॅग होती. या बॅगेतून दुर्गंधी येत होती. रिक्षा चालकाने हटकल्यानंतर त्या इसमाने तिथून पळ काढला. यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या बॅगमध्येच स्वत:च्या मुलीचा अर्धवट मृतदेह घेऊन तो जात होता. या मृतदेहाचे धड त्याने टीटवाळा येथे एका ठिकाणी पुरले होते.