माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा फोटो व्हायरल...आणखी एक वादग्रस्त घटना

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हर्षवर्धन जाधव यांची अवस्था पाहिली

Updated: Dec 16, 2020, 05:01 PM IST
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा फोटो व्हायरल...आणखी एक वादग्रस्त घटना title=

पुणे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हर्षवर्धन जाधव यांची अवस्था पाहिली तर हर्षवर्धन जाधव ओळखले जात नाहीत. पुण्यातील मारहाण प्रकरणानंतरचे हे फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव यांना खूनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन यांच्यासह त्यांची सहकारी इषा झा या महिलेवर देखील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हर्षवर्धन जाधव यांना कुणी मारलं?

पुण्यातील औंधमधील ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. हर्षवर्धन यांनी आपल्या गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेला लागला. यात या महिलेला किरकोळ दुखापत झाली. यावर महिला आणि तिच्या पतीसोबत हर्षवर्धन यांचा वाद झाला. यात जाधव यांनी त्या दाम्पत्याला मारहाण केली, आणि यानंतर ते तेथून निघून गेले.

पुढे रस्त्यावर हर्षवर्धन जाधव यांच्या वेगवान गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यातही अशी चर्चा आहे की,  दुचाकीस्वाराला उडवल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना तेथील जनतेने चोप दिला. यानंतर अजय अमन चढ्ढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हर्षवर्धन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा राजकीय कट - हर्षवर्धन जाधव

किरकोळ अपघाताच्या वादातून जाधव यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप  फिर्यादी अमन चढ्ढा यांनी केला आहे. हर्षवर्धन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत, हा गुन्हा राजकीय असल्याचं म्हटलं आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. मात्र हर्षवर्धन जाधव मागील काही वर्षापासून रावसाहेब दानवे यांच्यावर सतत आरोप करीत आहेत. ही घटना सोमवारी घडली आणि मंगळवारी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला, यामागे राजकारण असल्याचं हर्षवर्धन जाधव यांचा दावा आहे.

हर्षवर्धन जाधव यांचे वडील हे आमदार होते, त्यांच्या निधनानंतर हर्षवर्धन यांनी मनसेकडून निवडणूक लढवली. ते आमदार झाले. यानंतर ते शिवसेनेत गेले. यानंतर २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांच्या आरोपांच्या फैरी सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर सुरुच असतात.