मानस कन्येचा विवाह, गृहमंत्री झाले 'वधू' पिता तर जिल्हाधिकारी 'वर' पिता

 नागपुरात एक अनोखा विवाह सोहळा होणार आहे. (Unique marriage preparation) दोन अनाथांचे पालकत्व स्विकारत त्यात गृहमंत्री मुलीचं कन्यादान करणार आहेत. नागपूर जिल्हाधिकारी वधू पिता असणार आहेत.  

Updated: Dec 16, 2020, 03:35 PM IST
मानस कन्येचा विवाह, गृहमंत्री झाले 'वधू' पिता तर जिल्हाधिकारी 'वर' पिता  title=

अमर काणे / नागपूर : राजकारण आणि प्रशासनातील लोकं सामाजिक कर्तव्य पार पाडण्याबाबत नेहमीच बोलत  असतात. प्रत्यक्षात त्याबाबतची कृती मात्र फारच कमी जणांकडे दिसून येते. राज्याचे  गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) आणि नागपूरचे (Nagpur) जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (Collector Ravindra Thackeray) या दोघांनी मात्र राजकीय आणि प्रशासनिक क्षेत्रातील मंडळी समोर एक नवा आदर्श ठेवला आहे. अनोखा विवाह सोहळा होणार आहे. (Unique marriage preparation) दोन अनाथांचे पालकत्व स्विकारत त्यात गृहमंत्री मुलीचं कन्यादान करणार आहेत. नागपूर जिल्हाधिकारी वधू पिता असणार आहेत. या लग्नसोहळल्यापूर्वीचा मानसन्मानही गृहमंत्री देशमुख आणि जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या कुटुंबियांकडून अगदी परंपरेनुसार होत आहे.

जन्मापासून मुकबधिर असलेले समीर आणि वर्षा यांचा विवाह येत्या २० डिसेंबर  रोजी नागपुरात होत आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ दोघांची सांभाळ शंकरबाबा पापळकर यांनी केला. दोघांना शिकवले, त्यांना जगण्याचे बळ आणि उमेद दिली. समीर आणि वर्षा आयुष्यभरासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत.  वधू वर्षा एक वर्षाची असताना सुमारे २४ वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत आढळून आली.  मात्र नियतीनं तिला अमरावती  जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील वझ्झर इथल्या शंकरबाबा पापळकर यांकडे पोहचवले. त्यांनी तिला आईविडलांच्या प्रेमानं मोठं केले. 

अशीच काहीशी कहाणी वर असलेल्या समीरची आहे. डोंबिवली स्थानकावर बेवारस आढळलेला समीर आज २७ वर्षांचा आहे. समीर देखील त्याच्या  होणाऱ्या पत्नीप्रमाणेच मूकबधीर आहे. मात्र आता समीर आणि वर्षाचा लग्नसोहळा आगळावेगळा ठरणार आहे.  या लग्नासाठी "वधू" म्हणजेच वर्षाचे पितृत्व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वीकारले आहे.  तर "वर" समीर चे पिता  नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वीकारले आहे. आज समीर आणि वर्षा या दोघांचे लग्नकार्यासाठी पालकत्व  स्वीकारणाऱ्या कुटुंबाकडून केळवण करण्यात आले.

अनाथ म्हणून डोळे उघडणारे आणि आश्रमात शिकणारे दोघे  त्यांच्या प्रती कर्तव्य वाजवायला राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातील दोन प्रभावशाली कुटुंब समोर आल्याचे पाहून भारावून गेले. प्रशासकीय अधिकारी म्हणून आजवर अनेक कर्तव्य बजावले.  मात्र असा सामाजिक कर्तव्य पार पडताना मिळणारा समाधान  वेगळा असल्याची भावना जिल्हाधिकारी आणि वर पिता रवींद्र ठाकरे आणि त्यांच्या पत्नी  जोत्स्ना ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

लग्नापूर्वी होणा-या कुळाचार आणि केळवणासारख्या परंपरा देखील दोन्ही कुटुंबव्यवस्थित पार पाडताहेत. वराच्या कुटुंबाकडून झालेला पाहुणचार स्वीकारल्यानंतर समीर आणि वर्षा यांनी वधू पित्याचे म्हणजेच  गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवास्थान गाठले. गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्या पत्नी नागपुरात नसल्यानं देशमुख कुटुंबियांच्या वतीनं थोरली सून रिद्धी सलील देशमुख यांनी वागदत्त वर-वधूचं स्वागत केले आणि मानसन्मान केला.  देशमुख कुटुंबाची कन्या याच नात्याने वर्षाला सासरी पाठवू अशी भावना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सून रिद्धी देशमुख यांनी व्यक्त केली. 

गृहमंत्री आणि नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्या कुटुंबाने हा दोघांचं लग्नाचे पालकत्व स्विकारत राजकीय आणि प्रशासनातील लोकांना चांगले
उदाहरण घालून दिले आहे. नियतीने जोडलेले हे नाते या वागदत्त दाम्पत्याच्या जीवनात जिव्हाळा, आपुलकी आणि उमेद निर्माण करणार हे नक्की आहे.