हात मिळवण्याच्या बहाण्याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

 उस्मानाबाद येथे धक्कादायक प्रकार घडला.  शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर  चाकू हल्ला.

Updated: Oct 16, 2019, 09:31 PM IST
हात मिळवण्याच्या बहाण्याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना उस्मानाबाद येथे धक्कादायक प्रकार घडला. प्रचारासाठी फिरणाऱ्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना हात मिळविण्याच्या बहाण्याने चाकू हल्ला केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर बेसावध होते. त्यांच्यावर अजिंक्य टेकाळे नावाच्या तरुणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील पडोळी-नायगाव येथे चाकू हल्ला केला आहे. हातात हात देवून दुसऱ्या हाताने त्याने चाकू हल्ला केला. 

ओमराजे निंबाळकर हे कळंब-उस्मानाबाद मतदार संघातील शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी गावात पायी रस्त्यावरून चालत जात होते. त्यावेळी अनेक नागरिक त्यांना हात मिळवत होते. त्यांना शुभेच्छा देत होते. त्यावेळी अजिंक्य हाही पुढे आला. त्याने हात मिळविण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या हाताने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या पोटावर, हातावर आणि मनगटावर वार करण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. मात्र हातातील घडयाळवर चाकूचा पहिला वार झाल्याने खासदार थोडक्यात बचावले. तसेच दुसरा वार हातावर झाल्याने निंबाळकर जखमी झाले आहेत. दुखापत किरकोळ असल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोर तरुण पळून गेला असून हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. 

दरम्यान, 'मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने जखम खोल नाही. शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाना विनंती आहे, की शांतता राखावी. आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे, प्रचाराचे थोडेच दिवस शिल्लक आहेत. अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही, असे आवाहन ओमराजे यांनी केले आहे.