कोल्हापुरकरांचा नाद खुळा ! सुरु केलंय म्हशींचं ब्यूटी पार्लर

 म्हशींचं ब्युटीपार्लर आणि म्हशींचा या पार्लरला लय भारी असा प्रतिसाद

Updated: Dec 23, 2020, 07:33 PM IST

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : म्हशींच्या ब्युटी पार्लरबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा कुठे वाचलंही नसेल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत म्हशीची ब्युटी पार्लरची कहाणी. म्हशींचं ब्युटीपार्लर आणि म्हशींचा या पार्लरला लय भारी असा प्रतिसाद मिळतोय..

अगं अगं कोल्हापूरच्या म्हशी एवढ्या लगबगीनं कुठं जाशी... तर  ती म्हस चाललीय पार्लरमध्ये.....कोल्हापुरातलं हे नवं फ्यॅड.... दुपारी चार वाजता म्हशींची पार्लमध्ये अपाँईंटमेंट असतीय. पार्लरमध्ये वेटिंग पण असतंय.... पण एकदा का म्हशीचा नंबर लागला की आहाहा..एकदम फीलिंग गारेगार..लई फ्रेश फ्रेश.... शॉवर बाथ म्हणू नका, हेअर स्पा म्हणू नका, बॉडी मसाज, बॉडी स्क्रब सगळं काही म्हशीं इकडे एन्जॉय करतात... एवढंच काय म्हशींचा हेअरकट पण केला जातो...

एकावेळी आठ ते दहा म्हशीची बॅच असते.... तसं म्हस धुणं काय कोल्हापूरकराला नवं नाही.... तिला रगडून रगडून धुवायचं.... पण पंचगंगा आणि रंकाळ्यावर म्हशी धुवायला बंदी आली आणि त्यामुळेच सुरू झालं म्हशींचं हे ब्युटी पार्लर.....मंगेशकर नगरातले माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांची ही आयडिया... 

कोल्हापुरातल्या बहुतेक समद्या घरात म्हशी नांदतात... चांगलं फॅटवालं दूध देतात आणि धन्याला श्रीमंत बी करतात... म्हणूनच कोल्हापुरी गड्याचं म्हशीवर जिवापाड प्रेम.... म्हशीला असं प्रेमानं धुतलं की म्हैस फ्रेश आणि दुधाची धारही बेस्ट...

या म्हशींच्या ब्युटी पार्लरमध्ये चांगलं डोकं लढवलंय. म्हशी धुतल्या की ते पाणी शेतीला जातं... म्हशींचे केस खतासाठी वापरले जातात.. वेस्टमधून बेस्ट.. एकदम लय भारी... कोल्हापुरातलं म्हशींचं हे पार्लर सध्या जोमात आहे... एकदा का म्हशीला या पार्लरचा नाद लागला की ती बी ऐकत न्हाय... जाईन तर पार्लरमधीच, न्हाईन तर पार्लरमधीच म्हणतीया....