कोल्हापूर : राज्यातील अनेक भागांमध्ये आलेला (Flood) महापूर आणि त्यानंतरचे परिणाम काळीज पिळवटून टाकत आहेत. त्यातच आता अत्यंत धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोल्हापुरातील दरड कोसळतानाची दृश्य पाहून थरकाप उडत आहे.
(Kolhapur) कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ गडाच्या पायथ्याला दुसरं माळीण होताना वाचलं. पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठमधील काही परिसरात पन्हाळयाची तटबंदी कोसळली. ही तटबंदी कोसळून खाली वाहात येत असतानाची दृश्यं अंगावर शहारे आणणारी आहेत. ही दुर्घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. जिथे दरड कोसळल्यानंतर मोठमोठे दगड आणि झाडं खाली वाहून आली आणि त्यानंतर निसर्गाचा कोप नेमका कसा असतो याचंच विदारक चित्र त्या भागात दिसून आलं.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आणि अनेक भागांमध्ये दरडी कोसळल्या. प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरड कोसळण्यास सुरुवात होताच त्यांनी घरात धाव मारली, पण पुराचं पाणी घरात घुसलं आणि सारंकाही उध्वस्त झालं. गुरुवारी रात्री एकच्या सुमारास लहानलहान दगड कोसळण्यास सुरुवात झाली, अनेकांची शेतं वाहून गेली. डोळ्यांसमोर हा तांडव सुरु होता. पण, निसर्गाच्या या रौद्र रुपासमोर मात्र सारेच हतबल होते. पोलीस प्रशासनालाही या घटनेची माहिती देण्यात आली होती पण, रात्रीच्या अंधारात मात्र सर्वच मदतकार्यांना अडथळे येऊ लागले होते.
दुर्घटनेचं स्वरुप मोठं असून, त्याच जीवीत हानी झालेली नसली तरीही मालमत्ता आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं आता आपल्याकडेही मदतीचा हात वळवावा अशीच मागणी सदर भागातील नागरिकांनी शासनदरबारी केली आहे.