लातूर शहरात ७ हजाराहून अधिक खड्डे

'मी लातूरकर' ग्रुपतर्फे खड्ड्यांची मोजणी करण्यात आली

Updated: Nov 18, 2019, 04:54 PM IST
लातूर शहरात ७ हजाराहून अधिक खड्डे

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहरातील प्रमुख रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची मोजणी 'मी लातूरकर' ग्रुपतर्फे करण्यात आली. ज्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर जवळपास ७ हजार ३६५ मोठे खड्डे असल्याचा दावा या ग्रुपने केला आहे. 

ही मोजणी करत असताना पांढऱ्या रंगाच्या पेंटने या खड्ड्यांभोवती गोल करण्यात आला आहे. जेणेकरून वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे दिसावेत. प्रत्येक मोठ्या खड्ड्याभोवती पांढऱ्या रंगाने वर्तुळ केल्यामुळे रस्त्यावरील खड्डेही सहज दिसू लागले आहेत. 

  

महापालिका प्रशासनाने शहरात काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचं कामही सुरु केलं आहे. मात्र फक्त खड्डे बुजवून लाखो रुपयांचे बिल लाटण्यापेक्षा कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची मागणी 'मी लातूरकर' ग्रुपच्यावतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.