लातूर : जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी अनिश रंगराव रिठे याला मारहाण करण्यात आली होती. हा विद्यार्थी संस्थेच्या आदिवासी वसतिगृहात राहतो. वसतिगृहातील अधीक्षक आणि इतर पाच शिक्षकांनी डांबून मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याचे वडील रंगराव रिठे यांनी केला होता. मात्र जेसपीएम संस्थेचे संचालक अजित पाटील कव्हेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
आमची संस्था गेल्या तीन दशकांपासून संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान दानाचे पवित्र कार्य करते. त्यामुळे संस्थेच्या वसतिगृहात पाचवीच्या विद्यार्थ्यांला अशा पद्धतीने मारहाण झाली नसल्याचे संस्थेने केलेल्या चौकशीत पुढे आल्याचे कव्हेकर यांनी स्पष्ट केलंय. संस्थेने केलेल्या चौकशीत वसतिगृह अधीक्षक निरंजन बिराजदार यांनी अनिश रिठे या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे सिद्ध झालं आहे.
त्यामुळे संस्थेने तात्काळ निरंजन बिराजदारला निलंबित केलं आहे. तसेच वसतिगृहात होणारे असे प्रकार खपवून घेतलं जाणार नसल्याचेही स्पष्ट केलं आहे. दरम्यान अनिश रिठे हा विद्यार्थी वस्तीगृहातच असून तो अगदी ठणठणीत आहे. त्याच्या परीक्षा सुरू असून तो परीक्षा देत असल्याचेही संस्थेने स्पष्ट केलंय.
संस्थेने चौकशी केली ज्यात रेक्टर निरंजन बिराजदारला निलंबित केलं आहे. फक्त एकाने मारहाण केली होती त्यामुळे चौकशीअंती कारवाई केली आहे. संस्थेच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये १७ हजार हुन अधिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे असे प्रकार होत नाहीत. भविष्यात होणार नसल्याचे जेसपीएम संस्थेचे संचालक अजित पाटील कव्हेकर यांनी म्हटले आहे.