विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज दोन घोड्यांना इच्छामरण देण्यात आलं. घोड्यांना ग्लँडर्स नावाचा एक दुर्धर आजार झालाय. हा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळं प्रशासनासंमोर यांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, काराण हा आजार माणसांनाही होवू शकतो आणि त्यात माणासाचा मृत्यूही होवू शकतो.
ग्लँडर्स हा आजार अश्ववर्णीय प्राण्यांमध्ये होतो, यात घोडा, गाढव, खेचर यांना याची बाधा होते. या आजाराच्या संक्रमणामुळं प्राणी आणि संपर्कात आलेल्या माणासाचाही मृत्यू होतो. यामध्ये घोड्याच्या अंगावर फोड येतात त्यानंतर छिद्र पडून शरीरातून पाणी गळतं आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होवून घोडा मरतो. अलीकडच्या काळात राज्यभरात १७ घोड्यांना अशा पद्धतीनं दयामरण देण्यात आलं आहे. कुत्र्यांना रेबीज झाल्यास, कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यावर, गायीला मॅड काऊ हा रोग झाल्यावर अशा पद्धतीनं दयामरण दिलं जातं.
औरंगाबादेत एकूण ८६ घोडे आहेत. त्या सगळ्यांची आता तपासणी केली जाणार आहे, त्यांनाही ग्लँडर्सची लागण झालीय का याची शहानिशा करण्यात येणार आहे.