Leptospirosis In Mumbai: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळं अनेक आजारांनी डोकदेखील वर काढलं आहे. मुंबईत लेपटोच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिस चे 28 रुग्ण आढळून आले होते तर जुलै च्या पहिल्या पंधरवड्यात रुग्णसंख्या 52वर पोहोचली आहे. लेप्टोस्पायरोसिस झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरवर्षी जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे या काळात मलेरिया डेंगू आणि लेप्टोचे रुग्ण आढळतात. या रुग्णांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचते रस्त्यावरील हे पाणी बिळामध्ये शिरल्याने बिळातील घुशी उंदीर बाहेर येतात. तेव्हा त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात मिसळते आणि त्यामुळे शरीरावर जखम असल्यास आणि त्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळं साचलेल्या पाण्यात जास्त वेळ थांबू नये, असं अवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे.
- पावसाच्या साचलेल्या पाण्यातून जाऊ नये
- सांडपाणी मिसळलेल्या पाण्यातून जाऊ नये
- पायाला जखम झाली असल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार करावा
- साचलेल्या पाण्यातून जाण्याची आवश्यकता असल्यास गुडघ्यापर्यंत गम बूट घालावा
- तापासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावेत
लेप्टोस्पायरा जंतूचा संसर्ग झाल्यापासून ती व्यक्ती आजारी पडेपर्यंतचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यापर्यंतचा असू शकतो.
माणसांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची अनेक लक्षणे दिसून येतात. ताप येणे, थंडी वाजणे, पुरण येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. काहीवेळा पोटदुखी, उलट्या होणे, अतिसार अशा समस्यादेखील उद्भवतात.
बर्याचदा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसून येतात. तर दुसऱ्या टप्प्यात किडणी, यकृत यांच्यावर परिणाम करणारी गंभीर लक्षणे दिसून येतात. कावीळ, डोळे लाल होणे आणि त्यानंतर किडणी, यकृत निकामी होणे किंवा मेंदूज्वर असे आजारदेखील होऊ शकतात.