MNS Gudi Padwa Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केली आहे. शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. याचं कारण राज ठाकरे (Raj Thackeray) या मेळाव्यात आपली भूमिका मांडणार होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चा सुरु होत्या. पण अंतर्गत विरोध आणि जागावाटपावरुन फिस्कटलं असल्याचंही बोललं जात होतं. राज ठाकरेंनी यावेळी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट करत नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केलं.
9 Apr 2024, 20:44 वाजता
"महाराष्ट्र सैनिकांनो विधानसभेच्या तयारीला लागा. पुढील गोष्टी पुढे आहेत. सध्या आपण बांधणीचा विचार केला पाहिजे. मी लवकरच सर्वांना महाराष्ट्रभर भेटणार आहे"
9 Apr 2024, 20:38 वाजता
"पुढील 50 वर्षांचा विचार आपल्याला करायचा असतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. फडणवीसांना मी वाटाघाटीत मला पाडू नका असं सांगितलं. मला राज्यसभा आणि विधानपरिषदी नको सांगितलं. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. मनसे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत आहे. मला इतर काहीही अपेक्षा नाही"
9 Apr 2024, 20:35 वाजता
"10 वर्षांनी आपला देश पुन्हा वयस्कर होईल. नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच भविष्य आहे. प्रत्येक देशाचा एक काळ येतो. जसं जपानमध्ये एक काळ आला. तिथे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या. व्यवसाय निर्माण झाले, आणि आज कुठे आहे पाहा. असाच आपला देश घुसळून निघाला पाहिजे. जर तसं घडलं नाही तर सर्वांचा विश्वास उडून जाईल. देशात फक्त अराजक निर्माण होईल. देशात 6 लाख उद्योगपती देश सोडून गेल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं. हे आता होता कामा नये. महाराष्ट्र जो कर भरतो त्याचा मोठा वाटा मिळाला पाहिजे. यासाठी मोदींकडून अपेक्षा आहे. आगामी निवडणूक खड्ड्यात जाणार की वर हे भविष्य ठरवणारी आहे"
9 Apr 2024, 20:31 वाजता
"मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजपा आणि मोदींवर करत आहेत तशी मी करत नव्हतो. मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोध केला नाही. तर भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मी विरोधात बोलत असताना खिशातले राजीनामा काढून सोबत का आला नाहीत. तेव्हा सत्तेचा मलिदा चाटत होते. आज यांना या गोष्टी सुचत आहेत. पक्ष फुटला, सत्तेतून बाहरे काढलं म्हणून करत आहेत. मला काही हवं होतं म्हणून विरोध केला नाही"
9 Apr 2024, 20:28 वाजता
"2014 च्या निवडणुकीनंतर मला जे ऐकत होतो ते 5 वर्षात दिसत नसल्याचं लक्षात आलं. जे मला पटणार नाही ते मी सांगणार. ज्या चांगल्या वाटल्या त्यांचं कौतुक करणार. 20 ते 30 वर्षांनी एका व्यक्तीच्या हातात सत्ता आली. ज्यांच्याशी संबंध नसतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ज्याच्यावर विश्वास आहे त्याला तडा जाऊ लागतो तेव्हा राग येतो. माझा राग तर टोकाचा आहे. मी महाराष्ट्र, मराठी भाषा, लोकांवर टोकाचं प्रेम करतो. तसंच विश्वास टाकला तर टोकाचं प्रेम करतो. पण तसं दिसलं नाही तर टोकाचा विरोध करतो. लाव रे व्हिडीओमधून ही गोष्ट दिसली असेल. 370 कलम रद्द झाल्यानंतर सर्वात आधी मी अभिनंदन केलं. 5 वर्षात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्यांचं कौतुक केलं"
9 Apr 2024, 20:25 वाजता
"मी लहान असल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना पाहत आली आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती झाली होती. शिवसेनेनंतर भाजपा नेत्यांशी माझे जवळचे संबंध आले. यांच्यासोबतचे संबंध राजकारणाच्या पलीकडचेही होते. काँग्रेसवाल्यांशी माझा तसा काही संबंध आला नाही. त्यांच्या भेटी होत्या, पण गाठी पडल्या भाजपासोबत. तेव्हापासून चांगले संबंध प्रस्थापित झाले. प्रमोदजी गेले, त्यानंतर मी गुजरात दौऱ्यावर गेलो. नरेंद्र मोदींशी संबंध प्रस्थापित झाले. त्यांनी केलेला विकास पाहिला. ही सगळी प्रगती मी पाहत होतो. त्यावेळी मी गुजरात विकसीत होतोय, पण महाराष्ट्र फार पुढे आहे असं सांगितलं होतं. एक वेळ आली जेव्हा मोदी पंतप्रधान व्हावेत असं सांगणारा मी पहिला होतो".
9 Apr 2024, 20:22 वाजता
"दिल्लीला जाणारा मी पहिला ठाकरे नाही. भेटायला गेल्यावर त्यात मोठे आणि कमीपणा काय आहे. एकनाथ शिंदे वर्ष- दीड वर्षांपासून मला आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणत आहेत. पण एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय? मग मी अमित शाह यांना फोन करुन मला म्हणणं समजावून सांगा असं सांगितलं. यानंतर आमच्या तिघात चर्चा झाली आणि प्रकरण निशाणीवर आलं. मग आता लाव रे व्हिडीओचं काय होणार?"
9 Apr 2024, 20:20 वाजता
"1995 मध्ये मी शेवटचं जागावाटप चर्चेला बसलो होतो. त्यानंतर मी ही चर्चा केलेलीच नाही. मला ती घासाघाशी जमतच नाही. मग आमच्या चिन्हावर लढा असं सांगितलं. हे रेल्वे चिन्ह तुमच्या कष्टावर कमावलं आहे. सहज आलेलं नाही. चिन्हावर तडजोड होणार नाही"
9 Apr 2024, 20:18 वाजता
"मला जर शिवसेना प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच नसतो झालो का? मी काँग्रेसमध्ये जाणार असं त्यांना वाटत होतं. मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही असं मी स्पष्ट सांगितलं होतं. माझ्या मनात विचार नाही. काही ठरलं तर स्वत:चा पक्ष काढेन पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही असंच ठरवलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कोणाच्याही हाताखाली काम करणार नव्हतो. एकाला संधी दिली होती पण समजलंच नाहीत. मी शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही. मी मनसेचाच अध्यक्ष राहणार"
9 Apr 2024, 20:13 वाजता
मी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चक्रं सुरु झाली. वाटेल त्या बातम्या दिल्या जात असताना मी मजा घेत होतो. अमित शाह यांना दिल्लीत भेटायला गेलो होतो तेव्हा आम्हीच होती. मग तुम्हाला कुठून कळलं?