30 Jan 2024, 22:40 वाजता
'GRला विरोध केल्यास OBCआरक्षण रद्द करणार', मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : राज्यातला मराठा आरक्षणाचा वाद आता मंडल आयोगावर येऊन ठेपलाय...मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या जीआरला विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिलाय. मंडल आयोगाच्या अहवालालाच आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मंडल आयोगाला कुणीही आव्हान देऊ शकत नसल्याचा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
30 Jan 2024, 21:36 वाजता
मराठा सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Maratha Survey : मराठा समाजातील कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठीची मुदत आता २ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलीय... राज्य मागासवर्ग आयोगानं हा निर्णय घेतलाय. मराठा समाजातील खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत करण्यात येणार होत. मात्र ते पूर्ण न झाल्यानं आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आलीय.
30 Jan 2024, 20:03 वाजता
मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम
Manoj Jarange : कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या नव्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय. उद्याच नवा जीआर लागू करा अन्यथा १० फेब्रुवारीपासून आमदर उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. जरांगे रायगडावर छत्रपत्री शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
30 Jan 2024, 19:11 वाजता
2 फेब्रुवारीच्या बैठकीला आंबेडकर येणार- संजय राऊत
Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : मविआच्या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय...आजच्या बैठकीत मविआचा विस्तार...पुंडकरांचा काहीतरी गैरसमज झालाय...2 फेब्रुवारीच्या बैठकीला आंबेडकर येणार...मविआत अजिबात मतभेद नाहीत.... संजय राऊत यांचं वक्तव्य
30 Jan 2024, 18:26 वाजता
नव्या जीआरला कोर्टात आव्हान देणार- लक्ष्मण हाके
Laxman Hake on Manoj Jarange : मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरला कोर्टात आव्हान देणार असल्याचं मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन करून जीआर काढल्याचा आरोप हाकेंनी केलाय. जरांगेंनी आता कोर्टातच भेटावं असा इशारा त्यांनी दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
30 Jan 2024, 17:29 वाजता
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर
Ashok Saraf : आपल्या सदाबहार अभिनयानं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा सर्वोच्च पुरस्कार देऊन अशोक सराफांचा गौरव करण्यात येणाराय. २५ लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन अभिनयातून घडवलं, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं अभिनंदन केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
30 Jan 2024, 16:24 वाजता
छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार जलील आक्रमक
Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बुडालेल्या बँका आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. यात मोठ्या संख्येनं वृद्ध आणि महिला सामील झाल्या. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील काही बँकांवर आरबीआयनं निर्बंध आणले. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपये बँका आणि पतसंस्थांमध्ये अडकले. संचालक मंडळानं पोबारा केला. याविरोधात जलील यांनी आंदोलन सुरु केलंय.. यावेळी महिलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं..
30 Jan 2024, 16:10 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या आठवड्यात दिल्लीत NDA ची बैठक होणाराय... लोकसभा निवडणूक जागावाटपाबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचं समजतंय. त्यासंदर्भात शिंदे-पवारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
30 Jan 2024, 15:09 वाजता
पंतप्रधान मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौ-यावर येण्याची शक्यता आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर पंतप्रधान मोदी नतमस्तक होण्याची शक्यता आहे. तसंच पुणे विमानतळावर नव्याने झालेल्या टर्मिनलचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
30 Jan 2024, 14:58 वाजता
नारायण राणेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
Narayan Rane met Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय...सह्याद्री अतिथीगृहावर दोघांची भेट झाली...या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. ..