18 Dec 2024, 12:57 वाजता
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीत शेतकरी रस्त्यावर; लाल दिव्याच्या गाड्या फोडण्याचा इशारा
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकां ताब्यात घेत महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा या पुढील काळात सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही, प्रसंगी त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
18 Dec 2024, 12:51 वाजता
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांना मोठं यश; खरं कारण समोर येणार?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अटकेमुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विष्णू चाटेच्या अटकेमुळे या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
18 Dec 2024, 12:01 वाजता
फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
भाजपाचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून सभापतीपद निवडणुकीसाठी अर्ज भरला जाणार नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीकडे विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.
18 Dec 2024, 11:37 वाजता
दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेले राज्यसभा खासदार शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार हे दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संम्मेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं असून ते उद्घाटन समारंभाला नक्की येतील असा विश्वास व्यक्त केलेला.
18 Dec 2024, 10:48 वाजता
'योग्यवेळ आल्यावर...'; भुजबळांच्या नाराजीवर पक्षाची पहिली प्रतिक्रिया
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली आहे. "योग्यवेळ आल्यावर भुजबळांची भेट घेणार" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलं आहे. "भुजबळांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे", असंही तटकरे म्हणाले. "भुजबळांची भेट घेऊन सविस्तर चर्चा आम्ही करणार आहोत", असंही तटकरेंनी सांगितलं.
18 Dec 2024, 10:35 वाजता
अजित पवार विधानभवनाकडे रवाना
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या नागपूरमधील 'विजयगड' निवासस्थानातून विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. अजित पवार घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मोठा गराडा दिसून आला.
18 Dec 2024, 10:07 वाजता
अजित पवार घेणार भुजबळांची भेट; नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु
ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
18 Dec 2024, 09:26 वाजता
विधानसभा अध्यक्षपदानंतर भाजपाच्या हाती लागणार आणखी एक मोठं पद?
विधानसभेनंतर विधान परिषदेचं अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा महायुतीतर्फे राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 10 वाजता राम शिंदे अर्ज भरणार आहेत. विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सभागृहातील पक्षीय बलाबलात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीकडे 35 जागांचं बळ असून महाविकास आघाडीकडे केवळ 17 जागा असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जात आहे.
18 Dec 2024, 08:40 वाजता
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात होणार सहभागी
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
18 Dec 2024, 08:35 वाजता
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वडगाव मावळच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याचे शरीर हे फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.