18 Dec 2024, 07:41 वाजता
पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात पोलिसांकडूनच जादूटोणाविरोधी फिर्याद
पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात सरकार तर्फे पोलिसांनी 'महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013' नुसार गुन्हा दाखल केला आहे. धुळे पोलिसांनी पुढाकार घेत अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील तिघांना धुळे जिल्ह्यातील सांगावी परिसरात पैशाचा पाऊस पाडल्याच अमिष दाखवण्यात आलं होतं. या ठिकाणी या तिघांची लूट करण्यात आली होती. त्यांना मारहाणी करण्यात आले होती. या घटनेमध्ये गोळीबार ही झाला होता. त्यानंतर जखमी मांत्रिकावरती धुळे येथे उपचार सुरू असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गुन्ह्यासोबत जादूटोणा अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखला केला आहे. पोलीस स्वतःच या गुन्हामध्ये फिर्यादी झालेले आहेत.
18 Dec 2024, 07:39 वाजता
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : पाच आरोपींना पोलिस कोठडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींकडे फरार आरोपी आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा ताबा मागितला. त्यानुसार विशेष न्यायालयानेही त्या पाच आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी शुभमन लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर, भागवत सिंग, अक्षदीप सिंग, सलमान वोहरा आणि सुमीत वाघ अशी या पाच आरोपींची नावे आहेत. ते सर्व न्यायालयीन कोठडीत असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांचा ताबा मागितला. शुभमन लोणकरच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी करायची असल्याने पोलिसांनी प्रवीण लोणकरची पोलिस कोठडी मागितली. तर उर्वरित आरोपींकडे शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत आणि आर्थिक मदतीबाबत तपास करायचा असल्याने त्यांचा ताबा मागितला. बचावपक्षाच्या वकिलांनी या सर्व आरोपींची पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणतीही नवी कारणे पोलिसांकडे नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. प्रवीण लोणकर मकोकाअंतर्गत कबुलीजबाब देण्यास तयार नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
18 Dec 2024, 07:36 वाजता
'घड्याळा'चा फैसला नवीन वर्षात होणार, सुप्रीम कोर्टातील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत लांबणीवर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि 'घड्याळ' चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी द्विसदस्यीय खंडपीठापुढे सूचिबद्ध करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व 'घड्याळ' चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केले, असा दावा करीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी लक्षवेधी ठरणार आहे.
18 Dec 2024, 07:36 वाजता
लोणावळ्यात चेन स्नॅचिंग! घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
लोणावळा येथे चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोणावळ्यातील बापदेव रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वॉकसाठी जाणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले. या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे असफल झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली झाले. सर्रासपणे लोणावळ्यात सुरू असलेल्या या चेन स्नॅचिंग घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणावळ्यात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.
18 Dec 2024, 07:32 वाजता
भुजबळांचे आज शक्तिप्रदर्शन! काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
सकाळी अकरा वाजता छगन भुजबळ यांची संघर्ष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा नाशिकच्या जेजुरकर मळा येथे आयोजित करण्यात आली असून सभेच्या मंचावर भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याने ते नेमकं कोणाला आणि कसं लक्ष्य करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
18 Dec 2024, 07:32 वाजता
यंदाचा नाताळ थंडीशिवाय! उद्यापासून पुन्हा तापमान वाढणार
महाराष्ट्रात 19 डिसेंबरपासून पुढील 10 दिवस कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळला जाणवणारी तीव्र थंडी या वर्षी जाणवण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मात्र, वर्षाअखेरीस म्हणजे 29 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षात पुन्हा थंडीची अपेक्षा करता येईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात थंडीची लाट किंवा थंडीची लाटसदृश्य स्थिती जाणवणाऱ्या ठिकाणांचे पहाटे साडेपाचचे किमान तापमान 5 ते 15 अंशांपर्यंत नोंदविण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात भागानुसार कमी- अधिक प्रमाणात जाणवत असलेली थंडी आज टिकून राहील. नंतर तापमानात वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
18 Dec 2024, 07:29 वाजता
विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज दाखल होणार अर्ज
विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येतील. भाजपकडून प्राध्यापक आमदार राम शिंदेंना उमेदवार देण्यात आल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
18 Dec 2024, 07:28 वाजता
विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचा तिसरा दिवस वादळी ठरणार
विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येसह परभणीतील घटनेवरून विरोधक आक्रमक झाले असून या संदर्भात आज सभागृहात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे.