Breaking News LIVE Updates:जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज वर्षाचा शेवटचा दिवस... सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरु असतानाच दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Dec 31, 2024, 19:29 PM IST
Breaking News LIVE Updates:जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

31 Dec 2024, 11:13 वाजता

जरांगेंना पाहताच संतोष देशमुखांचे बंधू रडू लागले अन्...

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे आलेत. दोघांमध्ये चर्चा सुरू आहेत. धनंजय देशमुख यांना जरांगे यांच्या भेटीत अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपीला अटक केली नाही तर सगळं राज्य ढवळून काढू, असं म्हणत जरांगेंनी धनंजय देशमुख यांची समजूत घालत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

 

31 Dec 2024, 10:31 वाजता

सुरेश धस घेणार CM फडणवीसांची भेट; मुंबईच्या दिशेने रवाना

भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख प्रकरणात सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप आहे. 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही मागणी धस करणार आहेत. धस हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून आज दुपारी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत.

31 Dec 2024, 10:11 वाजता

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी कंडोम वाटणाऱ्या पुण्यातील क्लबला पोलिसांचा दणका

पुण्यातील मुंढवा भागातील नामांकित पबमध्ये होणारी पार्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. या संदर्भातली बातमी 'झी 24 तास'ने दिली होती. पुणे पोलिसांकडून या पबला काल नोटीस देण्यात आली होती. संबंधित पबने होणारी पार्टी अखेर रद्द केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली होती तसेच या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवले होते.

31 Dec 2024, 09:08 वाजता

नव्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका

आधी लोकसभा निवडणूक, नंतर पावसाळा आणि विधानसभा नंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. राज्य सरकारने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती दिली होती. त्याची मुदत संपत असल्याने नव वर्षात बुधवार 1 जानेवारी 2025 पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण प्रक्रिया सुरू करणार आहे.

31 Dec 2024, 08:34 वाजता

वाशिममधील दूध डेअरीला आग; लाखोंचं नुकसान

वाशिमच्या रिसोड शहरातील पंचायत समितीजवळ असलेल्या दूध डेअरीला आज सकाळी साडेपाच वाजता भीषण आग लागली. या आगीत डेअरीमधील साठवलेला दूध, उपकरणे आणि इतर माल जळून खाक झाला, या आगीत लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशमन विभागाने त्वरित घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आगीच्या नियंत्रणात येण्यापूर्वीच डेअरीला मोठे नुकसान झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

31 Dec 2024, 08:21 वाजता

पुणे विद्यापीठात आंदोलनांसाठी आठ दिवस आधी परवानगी बंधनकारक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनांसाठी आठ दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, अहिल्यानगर उपकेंद्र आणि नाशिक उपकेंद्र येथे कोणत्याही स्वरूपाच्या सभा, बैठका, आंदोलने आणि तत्सम कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. पूर्वपरवानगी न घेता सभा, बैठका, कार्यक्रम घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे जारी केलेल्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

31 Dec 2024, 07:31 वाजता

कोरेगाव भीमा अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल

उद्या होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत आज दुपारी दोन वाजल्यापासून बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित रहात असतात त्यामुळे पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. वाहतूक बदलाबाबतची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.

> पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव नगर रस्त्याला लागावे. तर सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे.

> मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे.

> मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.

31 Dec 2024, 06:46 वाजता

25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक

25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक शेखर पाटणकर असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे. एका बांधकामादरम्यान बाल कामगाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडे पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर यांनी 50 हजारांची लाच मागितली होती. त्यामध्ये 25 हजारांची लाचेची रक्कम ठरली होती. या प्रकरणी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर याला अटक करण्यात आली आहे. याच पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी पंधरा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ एक महिन्याच्या आत आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

31 Dec 2024, 06:46 वाजता

ठाणे : येऊरच्या जंगलात ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांवर मधमाशांचा हल्ला

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर, या ठिकाणी दहा तरुण ट्रेकिंगसाठी गेले असता मधमाश्या चावल्याच्या भीतीने काही तरुण तेथेच अडकले होते. सदर घटनास्थळी डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची सुटका वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून व टीडीआरएफ जवानांकडून सुखरूप केली आहे. सदर मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले तसेच मधमाश्या चावून गंभीर दुखापत झालेल्या तिघांना क्रीटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

31 Dec 2024, 06:45 वाजता

नववर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ

विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेगाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, या रेल्वेगाडीला सावंतवाडी रोड येथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतल्याने हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल.