Maharashtra Assembly Winter Session 2023 : राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा आठवा दिवस आहे. आजपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही सभागृहात आज नागपुरात झालेल्या स्फोटासंदर्भात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. आजपासून महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
18 Dec 2023, 16:33 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : माझ्याविरोधात जुने आरोप शोधून काढले जात आहेत - गिरीश महाजन
"एकनाथ खडसेंची पायात चप्पल घालायची सुद्धा अवस्था राहणार नाही. माझ्याविरोधात जुने आरोप शोधून काढले जात आहेत. या उद्वेगातून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. कुंभमेळ्याच्या वेळेसचा हा फोटो आहे हे मी मान्य करतो. त्यावेळी हे लोक कोण होते, काय होते याची आम्हीच चौकशी करुन घेतली आहे. त्यावेळेसचा लेखी अहवाल आजही समोर आहे. त्यांचा दाऊदशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांनी आम्हाला आमंत्रण दिले होते. एकनाथ खडसेंचा सत्यानाश झालेला आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही. आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते बुडाले आहेत. त्यांना 167 कोटी रुपये भरायचे आहेत. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सलीम कुत्ता बॉम्बस्फोटातील सहभागी आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे असे असाताना बडगुजर त्याच्यासोबत कसे नाचत आहेत. शिवसेनेची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की, त्यांना आता काही कळत नाहीये, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
18 Dec 2023, 16:23 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : विजय वडेट्टीवारांवर संतापले गुलाबराव पाटील
कांद्याच्या मुद्द्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या लक्ष्यवेधीवरुन चर्चा सुरु असताना वडेट्टीवार यांनी कांदा प्रश्नी केंद्र सरकारकडे जाता असा उल्लेख केला. यामुळे मंत्री गुलाबराव पाटील संतापले. हा कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
18 Dec 2023, 14:55 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : मंत्र्यांवर बेछूट आरोप केल्याबद्दल माफी मागायला हवी - देवेंद्र फडणवीस
"ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते तिथे सगळ्या पक्षाचे लोक गेले होते. ते लग्न नाशिकच्या मुस्लिम धर्माच्या प्रमुखांच्या पुतण्याचे होते. त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. ज्यांच्या कुटुंबियांचा लग्नसोहळा होता त्यांचा दाऊदशी संबंध नाही. ज्या मुलीसोबत लग्न झालं त्यांच्या वडिलांचे जे सासर आहे त्यातील एका नातेवाईकाचे दाऊदच्या नातेवाईकाशी लग्न झाल्याचा आरोप केला. पण त्यांचाही दाऊदशी संबंध नव्हता. त्यावेळी आरोप झाल्यानंतर मी स्वतः चौकशी समिती नेमली होती. अहवालातून स्पष्ट झाले की शेहरे खतीब यांचा दाऊदशी काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे आले म्हणून अशा प्रकारचे विषय आले असतील. एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा करायला हवी होती. अशा प्रकारची तडफड बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचताना का नाही दाखवली. कुठलाही संबंध नसताना मंत्र्यांवर बेछूट आरोप केल्याबद्दल माफी मागायला हवी. विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत," असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
18 Dec 2023, 14:15 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : दाऊदशी संबंध आहेत त्या सगळ्यांवर एसआयटीमार्फत कारवाई केली जाणार - शंभूराज देसाई
"लग्नसमारंभाचे निमंत्रण आमदारांना मिळतं. अशा लग्नासाठी आम्ही अनेकवेळा जात असतो. लग्नातले फोटो दाखवून मंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरु आहे. त्यामधून सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. चौकशीमधून सत्य समोर येणार आहे. ज्यांना भीती नसेल त्यांनी चौकशीला सामोरे जावे. ज्यांचे दाऊदशी संबंध आहेत त्या सगळ्यांवर एसआयटीमार्फत कारवाई केली जाईल. यामध्ये कुठल्याही मंत्र्यांचा संबंध नाही," अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
18 Dec 2023, 14:06 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : रातोरात आमंत्रण पत्रिका बदलली; एकनाथ खडसेंचा आरोप
"या विवाहसोहळ्यामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार उपस्थित होते. हे प्रकरण माध्यमांत आल्यानंतर चौकशीला बगल देण्यासाठी रातोरात आमंत्रण पत्रिका बदलली. जसे सुधाकर बडगुजरवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत तसे तसे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. या लग्नाचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. राज्याचा मंत्री तिथे उपस्थित असल्याचे फोटो असतील तर त्याने मंत्रीमंडळात राहणे कितपत योग्य आहे," असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
18 Dec 2023, 13:56 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप
दाऊद इब्राहिमसंबंधित एका लग्नात मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्याचे फोटो खडसे यांनी विधान परिषदेत दाखवले तसेच महाजनांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली. खडसे यांच्यानंतर या प्रकरणी संबंधित मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधन परिषदेत विरोधकांनी केली आहे.
18 Dec 2023, 13:51 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा अधिकार मिळाला आहे का? - अनिल परब
"सभागृहात आरोप होऊन मुख्यंमत्री, मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. दाऊदशी संबंधित असलेल्याच्या लग्नामध्ये पालकमंत्री गेले होते असे एकनाथ खडसे म्हणाले. आयबीने या लग्नावर लक्ष ठेवलं होतं. आयबीच्या निरीक्षणावरुन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली. जे पोलीस लग्नाला गेले त्यांच्यावर कारवाई करता. जे मंत्री गेले त्यांच्यावर कारवाई नाही. नवाब मलिकांना 19 महिने तुरुंगात ठेवलं. जेव्हा त्या बाजूला गेले तेव्हा त्यांना ताबडतोब सोडून दिलं. सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा अधिकार मिळाला आहे का? असा सवाल अनिल परब यांनी केला
18 Dec 2023, 11:39 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : ललित पाटील यांना संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा - विजय वडेट्टीवार
"ललीत पाटीलला जे संरक्षण मिळालं आणि तो पळाला. त्यानंतर जी कारवाई झाली ते या सरकारचे सोंग आहे. सरकारचा हे सगळं पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. हे सरकार तरुणाईला उद्धवस्त करणारं आणि राज्य ड्रग्जच्या विळख्यात घालणारं आहे. याप्रकरणी ठोस कारवाई व्हावी आणि ड्रग्जचे सगळे अड्डे उद्धवस्त व्हावेत ही आमची मागणी आहे," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
18 Dec 2023, 11:32 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : नागपूर स्फोटाप्रकरणी मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करा - विजय वडेट्टीवार
"नागपूरमध्ये रविवारी सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट होऊन नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्याआधी याच कंपनीमध्ये स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. ही तिसरी घटना आहे. दहावी बारावी शिकलेले कामगार हे एक्सप्लोजिव हाताळू शकतात का? स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना तुम्ही मदत करणार पण अनाथ झालेल्या दोन मुलींचे संगोपन कोण करणार? कंपनीच्या मालकाने मजूरांचा खून केला आहे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा. जिथे स्फोटके तयार होतात तिथे कंत्राटी मजूर लावले जातात," असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
18 Dec 2023, 11:21 वाजता
Maharashtra Assembly Winter Session 2023 : आज नागपूरच्या विधान भवनावर धडकणार 27 मोर्चे
नागपूरच्या विधानभवनावर आज विविध मागण्यासहा 27 मोर्चे धडकणार आहेय..त्यामध्ये रुग्णवाहिका चालक यांची कंत्राटी पद्धत बंद करावी..अतिक्रमण धारक,प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचा सह विविध मागण्यांसाठी मोर्चे धडकणार आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.