Sambhaji Nagar Lok Sabha : संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना? इम्तियाज जलील पुन्हा मारणार बाजी?

Chhatrapati Sambhaji Nagar LokSabha : संभाजीनगरमधून लढण्यासाठी सगळेच पक्ष उत्सूक आहेत. महायुतीत शिवसेना की भाजप, अशी रस्सीखेच आहे. तर शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत वादावादी सुरूय. एमआयएमच्या ताब्यात असलेल्या संभाजीनगर मतदारसंघात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, पाहूयात रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Mar 20, 2024, 08:28 PM IST
Sambhaji Nagar Lok Sabha : संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना? इम्तियाज जलील पुन्हा मारणार बाजी? title=
Chhatrapati Sambhaji Nagar LokSabha

Chhatrapati Sambhaji Nagar LokSabha Constituency : संभाजीनगर... राज्याची पर्यटन राजधानी... 52 दरवाजांचं मराठवाड्याच्या राजधानीचं शहर... पूर्वीचं औरंगाबाद... निजामशहाचा मंत्री मलिक अंबरनं वसवलेलं हे शहर. औरंगजेबाच्या नावावरून त्याचं औरंगाबाद असं नाव पडलं. खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे... मात्र आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झालंय... त्यामुळं गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या राजकारणावर पडदा पडलाय. निदान आता तरी संभाजीनगरच्या विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवली जाईल, अशी अपेक्षा आहे.

संभाजीनगरात विकासाचा दुष्काळ

अजिंठा-वेरूळसारखी जागतिक दर्जाची पर्यटनस्थळं इथं आहेत. मात्र पर्यटन वाढीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला जात नाही.पर्यटन राजधानी असूनही दिल्ली-मुंबईला जोडणा-या गाड्यांची संख्या पाचपेक्षा जास्त नाही. एवढ्या मोठ्या शहरात आठ दिवसाआड पाणी येतं... गेल्या कित्येक वर्षांपासून यावर तोडगा निघालेला नाही. शहरात नावाला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे... मात्र दिवसातून केवळ एक विमान मुंबईला आणि एक विमान दिल्लीला जातं. देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून ऑरीक सिटी वसली. मात्र नाव वगळता तिथं काहीच स्मार्ट नाही. उद्योग वाढीसाठी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजे डीएमआयसी वसवलं. तिथंही अजून उद्योग आलेले नाहीत.'

संभाजीनगरचं राजकीय गणित 

चंद्रकांत खैरेंच्या रुपानं तब्बल २० वर्षं या शहरात शिवसेनेचा खासदार होता. गेली पाच वर्षं एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहेत. मात्र विकासाच्या नावावर शहराच्या नशिबी दुष्काळच आहे. 1999, 2004, 2009 आणि 2014 असे चार टर्म चंद्रकांत खैरे खासदार होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंह पवारांचा ३३ हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटलांना दीड लाख मतांनी हरवलं. मात्र 2019 मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना केवळ ४ हजार ४०० मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांनी घेतलेल्या 2 लाख 83 हजार मतांमुळं खैरेंचा पराभव झाल्याचं मानलं जातंय. विधानसभेचा विचार केला तर शिवसेनेचे 4 आणि भाजपचे 2 आमदार निवडून आले होते. त्यापैकी प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट आणि रमेश बोरनारे या 3 शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली.

इम्तियाज जलील रिंगणात 

यंदा पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील एमआयएमकडून रिंगणात आहेत. अमित शाहांच्या अलिकडेच झालेल्या सभेत त्यांनी एमआयएमला उखडून फेका, असं आवाहन केलं होतं. युतीच्या गणितात ही जागा शिवसेनेकडे असली तरी आता भाजप इथून लढण्यासाठी इच्छुक आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघ बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप की शिवसेना शिंदे गट, हा काथ्याकूट अजूनही संपलेला नाही. तर दुसरीकडं शिवसेना ठाकरे गटातही पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

एमआयएम, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत संभाजीनगरात रंगणाराय. गेल्यावेळी हिंदू मतांच्या विभाजनामुळं संभाजीनगरात एमआयएमचा खासदार निवडून आला. मात्र जो कुणी निवडून येतो, तो या ऐतिहासिक शहराला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीच करत नाही, ही इथल्या मतदारांची खंत आहे.