LokSabha : राहुल शेवाळे करणार विजयाची हॅटट्रिक? नवख्या अनिल देसाईंसाठी कसं असेल राजकीय गणित?

South Central Mumbai LokSabha : दक्षिण मध्य मुंबईत दोन शिवसेना एकमेकांना भिडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार अनिल देसाई यांच्यात सामना होणार आहे. नेमकी काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Apr 13, 2024, 09:53 PM IST
LokSabha : राहुल शेवाळे करणार विजयाची हॅटट्रिक? नवख्या अनिल देसाईंसाठी कसं असेल राजकीय गणित? title=
South Central Mumbai LokSabha Election 2024

South Central Mumbai LokSabha Election 2024 : दक्षिण मध्य मुंबई... अर्थात मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण... राजकीय सभांचा आखाडा असलेलं आणि सचिन तेंडुलकरसारखे महान क्रिकेटपटू घडवणारं शिवाजी पार्क इथंच आहे. मिश्र लोकवस्तीचा हा मतदारसंघ.. एकीकडं दादर माटुंगा परिसरातल्या उच्चभ्रू लोकांच्या हायफाय सोसायट्या... दुसरीकडं धारावी, चेंबूर म्हणजे कष्टकरी, गरीब, हातावर पोट असणा-यांची वस्ती.. धारावी तर आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी... 600 एकरवर पसरलेल्या धारावीत अठरापगड जातीचे, धर्माचे, भाषांचे, भारताच्या कानाकोप-यातले सुमारे १० लाख लोक राहतात. याच धारावीत हजारो छोटे मोठे उद्योग चालतात. सध्या धारावी पुनर्वसनाचा मुद्दा तापलाय. हे काम अदानी समूहाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. लोकसभा प्रचारातही हा मुद्दा गाजणाराय

केवळ धारावीच नाही तर झोपडपट्ट्या, जुन्या चाळी, गावठाणं, कोळीवाडे यांचेही पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आहे. दाटीवाटीच्या वस्त्या आणि अरुंद रस्ते यामुळं वाहतुकीची कोंडी कायम असते. चेंबूर, माहुल परिसरात प्रदूषणानं गंभीर स्वरूप धारण केलंय. 

2009 पूर्वी हा सगळा भाग उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात येत असे. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई म्हणून ओळखला जाऊ लागला. 2009 मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांनी शिवसेनेचे सुरेश गंभीर यांचा 75 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांना हरवलं. 2019 मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली. गायकवाडांचा पराभव करून शेवाळे दुस-यांदा खासदार झाले. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, शिवसेनेचे 2, काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार निवडून आले होते.

आता विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाकडून रणमैदानात उतरलेत. भाजप सोबत असली तरी शिवसेनेची संघटनात्मक ताकद आता त्यांच्या पाठीशी नाहीय. त्यामुळं ही निवडणूक त्यांच्यासाठी सोप्पी असणार नाहीय. दुसरीकडं शिवसेना ठाकरे गटानं अनिल देसाईंना उमेदवारी दिलीय. ते नवखे असले तरी त्यांच्यामागे शिवसेनेची ताकद, उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, काँग्रेसची साथ आणि मुस्लीम व्होटबँक असणार आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून लढण्यास इच्छुक होत्या. ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र अनिल देसाईंच्या विजयासाठी शंभर टक्के प्रचार करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिलीय.