अमित जोशी , झी 24 तास मुंबई : देशात नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीने सर्वांचेच आराखडे अंदाज फोल ठरले यात शंका नाही. राज्यातही मोदी लाटेचा परिणाम असला तरी आणखी काही मुद्दे, राजकीय हालचाली या परिणामकारक ठरल्या.राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. विशेषतः गेल्या काही महिन्यातील नाट्यमय राजकीय घडामोडी, शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं निवडणुकीचे आयोजन यामुळे महायुतीचा विजय झाल्याचे चित्र आहे. तुलनेत काँग्रेस आघाडीच्या अपेक्षा पार धुळीस मिळाल्या. संघटना आणि निवडणूक पातळीवर काँग्रेस भुईसपाट झाली तर शरद पवार यांचं राजकारण पूर्णपणे अपयशी झालं. राज्यात भाजप-शिवसेनेच्या विजयासाठी काही फॅक्टर्स महत्त्वाचे ठरले.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी ऑक्टोबरपासून नियोजनबद्ध पावलं
दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे रोष निर्माण होणार नाही याची काळजी
आधीचं सर्व विसरून योग्य वेळी शिवसेना भाजपाची हातमिळवणी
शिवसेना - भाजपाची पक्ष बांधणी आघाडीच्या तुलनेत उत्तम, प्रचार नियोजनबद्ध
5 वर्षातील विकास कामं लोकांपर्यंत पोहचवण्यात यश
शहरांमध्ये सुरू असलेली मेट्रोची कामं परिणामकारक
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा प्रभावी
शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय प्रभावी
पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमाचे पैसे देण्याची योजना परिणामकारक
ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षातील महत्वाचे नेते महायुतीच्या गळाला
विस्कळीत झालेली काँग्रेस, ठराविक ठिकाणी अडकलेली राष्ट्रवादी याचा फायदा महायुतीला
वंचित बहुजन आघाडीचा काही प्रमाणात फायदाही महायुतीला
यामुळे काही जागा कमी होतील अशी अटकळ बांधली जात असतांना राज्यात वर्चस्व ठेवण्यात महायुती चांगलीच यशस्वी ठरली.
आता केंद्रात पुन्हा एनडीएची सत्ता आल्याने पुन्हा एकदा केंद्राकडून आर्थिक किंवा राजकीय पाठबळ मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील चार महिन्यात राजकीय उलथापालथं होण्यासाठी महायुती आणखी ताकद लावेल यात शंका नाही. थोडक्यात केंद्रात एनडीएची सत्ता आल्याने महायुतीसाठी राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.