मुंबई : लोकसभा निवडणूक निकाल २०१९ मध्ये भाजपनं बाजी मारलेली दिसतेय. भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून ३५४ चा आकडा गाठलाय. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना ९० च्या आकड्यावर समाधान मानावं लागलंय. राज्यातील एकूण ४८ जागांपैंकी अंतिम स्थितीनुसार भाजपा २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस १, एआयएमआयएम १ आणि अपक्ष १ जागेवर विजय मिळवलाय. हे ४८ उमेदवार लवकरच खासदारकीची शपथ घेऊन संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. उल्लेखनीय म्हणजे, या ४८ विजयी उमेदवारांमध्ये केवळ आठ महिलांचा समावेश आहे.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या कांचन कूल यांच्यावर १,५५,७७४ मतांनी मात केली. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांचा ८०,००० मतांनी पराभव केला होता.
उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १,३०,००५ मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १,८६,७७१ मतांनी पराभव केला होता
बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपिनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांचा १,६८,३६८ मतांनी पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीकडून विष्णू जाधव निवडणुकीच्या रिंगणात होते. २०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांचा १,३६,४५४ मतांनी पराभव केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पुन्हा पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा विजय झाला होता.
नंदूरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार ऍड. के सी पाडवी यांच्यावर ९५६२९ मतांनी मात केलीय. २०१४ च्या निवडणुकीत हिना गावित यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा १,०६,९०५ मतांनी पराभव केला होता.
रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा ३,३५,८८२ मतांनी पराभव केलाय. २०१४ लोकसभा निवडणुकीतही रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा जवळपास ३ लाख मतांनी पराभव केला होता.
अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा ३६,९९१ मतांनी पराभव केलाय. २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये अमरावतीतून शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा १,३७,९३२ मतांनी पराभव केला होता.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना पुंडलिकराव गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा तब्बल १,१७,९३९ मतांनी पराभव केला. २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा ९३,८१६ मतांनी पराभव केला होता.
दिंडोरी मतदार संघातून भाजपाच्या डॉ. भारती प्रवीण पवार यांनी काँग्रेसच्या धनराज महाले यांना १,९८,७७९ मतांनी पछाडलंय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरिशचंद्र चव्हाण यांना ५,४२,७८४ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना २,९५,१६५ तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना ७२,५९९ बसपाच्या शरद माळी यांना १७,७२४, आपच्या ज्ञानेश्वरी माळी यांना ४,०६७ मते मिळाली होती
राज्यात ८ कोटी ७० लाख मतदार आहेत. यापैंकी पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ५० लाख आहे तर महिला मतदार ४ कोटी २० लाख आहेत. या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ५० टक्के मतदार महिला आहेत. मात्र, सर्वच पक्षांतून महिलांना उमेदवारीची संधी देण्याबाबत उदासीनता दिसून आली. भाजपानं राज्यात २५ जागा लढवल्या त्यापैंकी सात महिलांना उमेदवारी दिली. काँग्रेसनंही २५ जागा लढवताना केवळ तीन महिलांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या १९ जागांपैकी केवळ एक महिला उमेदवार रिंगणात होती तर शिवसेनेनंही २३ पैंकी केवळ एका महिलेलाच तिकीट दिलं होतं.