दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजपाचा पराभव करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलेल्या राज्यातील काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडी भाजपासाठी फायद्याच्या ठरतील अशाच आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बदललेला मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष, चंद्रपूरमधील उमेदवारीचा गोंधळ, औरंगाबाद आणि रामटेकमधील बंडखोरी या सगळ्यामुळे काँग्रेसमधील गोंधळाचे वातावरण निवडणुकीच्या धामधुमीत समोर आलं आहे. पाहूयात एक विशेष रिपोर्ट...
राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापायला लागलंय. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण शक्तीनिशी उतरलाय. उमेदवार जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील नाराजी आणि बंडखोरी समोर येताना दिसतेय. मात्र काँग्रेसमधील गोंधळ सर्वाधिक आहे. एकीकडे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचलेलं आहे. लोकसभेनंतर राज्यात झालेल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसला फटका बसला. लागोपाठच्या पराभवातून सावरून लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची रणनिती काँग्रेसने चार महिन्यांपूर्वी आखली होती. प्रामुख्याने ग्रामीण भागात भाजपा सरकारविरोधात असलेला रोषाचा फायदा आपल्याला होईल अशी काँग्रेसला आशा आहे. त्यामुळेच भाजपाचा पराभव करण्याच्या ईर्षेने राज्यातील काँग्रेसचे नेते कामाला लागले. मात्र जसजशी निवडणूक जवळ येत गेली तसतसे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि संघर्ष समोर येत गेले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपात केलेल्या प्रवेशाने याची सुरुवात झाली.
- विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच भाजपाच्या गळाला लागल्याने काँग्रेसची लाज वेशीला टांगली गेली.
- त्यातच नगरमध्ये आपण आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं विखे-पाटील यांनी जाहीर केलं
- नांदेडचे विद्यमान खासदार असलेले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुरुवातीला लोकसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली होती. आपल्या जागी पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्याची त्यांची मागणी होती. सेनापतीनेच मैदानातून माघार घेण्याचं ठरवल्यानं पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांना निवडणूक लढवण्याचे थेट आदेश दिल्याने प्रदेशाध्यक्षांचाच नाईलाज झाला
- त्यातच चंद्रपूरमध्ये विनायक बागडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिथली नाराजी समोर आली. या उमेदवारीवरून हतबलता दर्शवताना अशोक चव्हाण थेट राजीनामा देण्याची भाषा करत असल्याची ऑडिओ क्लीप समोर आली
- या नाराजीनंतर २४ तासाच्या आत काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला. काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल म्हणून आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या बाळू धानोरकरांना पक्षाने उमेदवारी दिली
- हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय कळवल्यानंतर काँग्रेसने शिवसेनेचे माजी खासदार आणि भाजपात असलेले सुभाष वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केली, उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेण्यात आला
- औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे
- रामटेकमध्ये किशोर गजभिये हे उमेदवारी अर्ज भरायला निघाले असताना माजी मंत्री नितीन राऊत यांनीही उमेदवारी अर्ज भरण्याची धमकी पक्षाला दिली. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नसला तरी राऊत यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे
- नागपूरमध्ये केंद्रीय मंत्राी नितीन राऊत यांचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने नाना पटोले यांना मैदानात उतरवले आहे. मात्र इथेही काँग्रेसच्या नेत्यांची साथ पटोले यांना मिळताना दिसत नाही. माजी मंत्री अनिस अहमद यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून पक्षाला अपशकून केला आहे.
- लोकसभेच्या पाच जागा लढवत असलेल्या मुंबईतील काँग्रेसमधील गटबाजीही निवडणुकीच्या धामधुमीत समोर आली आहे. संजय निरुपम यांची अचानक उचलबांगडी करून मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी पक्षाने नियुक्ती केली आहे. मात्र अध्यक्ष बदलाचा पक्षाचा टायमिंग चुकल्याने मुंबई काँग्रेसमध्ये आणखी गोंधळ आणि गटबाजी निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
- पक्षातील हा गोंधळ कमी म्हणून की काय अद्याप काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार ठरता ठरेना
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि गटबाजी संपेल आणि काँग्रेसचे नेते पक्षाला नवी उभारी देण्यासाठी एकत्र काम करतील अशी अपेक्षा होती. मात्र सुंभ जळाला तरी पीळ काही सुटत नाही, अशी अवस्था राज्यातील काँग्रेसची आणि काँग्रेसच्या नेत्यांची झाली आहे. नेते पक्षहितापेक्षा स्वतःचे हिताला प्राधान्य देत असल्याने काँग्रेसची अवस्था वाईटातून वाईटाकडे सुरू असल्याचं चित्र आहे.