Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Manjo Jarange Patil: महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर सातत्याने बैठकींचं सत्र सुरु असतानाच आज अचानक वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याची घोषणा करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
जरांगे पाटलांबरोबर चर्चा झाली त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीचे सदस्य असलेले किसन चव्हाण आणि फारुख अहमदही सहभागी झाले होते. बदलाचं राजकारणाला नव्याने सुरुवात करण्याची चर्चा जरांगेंबरोबर झाली, असं आंबेडकरांनी सांगितलं. "वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची काल बैठक झाली. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जे आमच्याबरोबर समजोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही जरांगे-पाटील फॅक्टर लक्षात घ्यायला हवा असं आम्ही सुचवलं होतं. मात्र त्यांनी तो लक्षात घेतलं नाही. त्यामुळेच काल मी, फारुख अहमद आणि किसन चव्हाण यांनी जरांगे पाटलांबरोबर चर्चा केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याची पहिल्या फेजची तारीख आहे. त्यामुळे आज पहिली यादी जाहीर केली," असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटलांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये, "शेतकरी, बेरोजगारांचा प्रश्न, शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय कसे उभारता येतील याची चर्चा झाली. या सर्व प्रश्नांमध्ये ओबीसी समाजाचे लोकसभेत एक किंवा दोन व्यक्ती सोडल्यास गेल्या 70 वर्षात प्रतिनिधी दिलेले नाहीत. त्यामुळे या वेळेस ओबीसी, भटके-विमुक्त फॅक्टर लक्षात घेत या समाजातून उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणायचं निश्चित झालं," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जास्तीत जास्त उमेदवार गरीब समाजातील असावे आणि त्यांनाच पुढे आणण्याचा निर्णय जरांगेंबरोबरच्या बैठकीत झाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. "पहिल्या यादीतील उमेदवारांना जरांगे पाटलांचं समर्थन आहे. आपल्या संघटनेच्या माध्यमातून 30 तारखेला निवडणुकीत कसं सहभागी व्हावं, काय भूमिका घ्यावी यावर मतं मागितली आहेत. 30 तारखेपर्यंत कोणती घोषणा न करण्याची विनंती जरांगेंनी केली ती आम्ही मान्य केली आहे. दोघांनीही कोणत्याही उमेदवारांवर दबाव आणला जाणार नाही असं ठरवलं आहे. मात्र जे गरीब, स्वच्छ प्रतिमेचे आणि काहीतरी करण्याची जिद्द असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल. बाकी जागांची यादी 2 तारखेपर्यंत निश्चित होईल. 4 ला फॉर्म भरण्याची शेवटची संधी असल्याने 2 तारखेपर्यंत नावं निश्चित केली जातील," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नक्की वाचा >> UBT First List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! मुंबईतील 4 जागांसहीत 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा
"भाजपाने मुस्लिमांच्या आयसोलेशनचं राजकारण सुरु केलं आहे त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लीम उमेदवारसुद्धा उतरवायचे आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची. जैन समाजाचाही उमेदवार उतरवरुन त्याला जिंकून आणायचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम आणि इतर समाजाची नवीन वाटचाल आम्ही या माध्यमातून मांडत आहोत. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी आमची अपेक्षा आहे. राजकारण आणि निवडणूक यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो. गावागावातून आणि कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरुवात करावा, शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या अर्ध्या खर्चात निवडणुका पार पडतील असं आम्ही ठरवलं आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नक्की वाचा >> 22 पैकी 17 जागांवरच ठाकरेंचे उमेदवार! 'या' 5 जागांवर 'मशाल' कोणाच्या हाती? संभ्रम कायम
भंडारा-गोंदिया - संजय गजानन केवट (दिवर समाज)
गडचिरोली-चिमुर - हितेश पांडुरंग मडावी (गौंड समाज)
चंद्रपूर - राजेश वारलुजी बेले (तेली समाज)
बुलढाणा - वसंत राजाराम मगर (माळी समाज)
अकोला - प्रकाश आंबेडकर
अमरावती - प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान (राखीव)
वर्धा - प्राध्यापक राजेंद्र साळुंखे (कुणबी)
यवतमाळ वाशिम - खेमसिंग प्रतापराव पवार (बंजारा)
नागपूर - काँग्रेसला समर्थन
सांगली - ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून प्रकाश शेंडगे लढत असतील तर त्यांना पाठिंबा देणार
रामटेक मतदारसंघाचा उमेदवार आज (27 मार्च 2023 रोजी) संध्याकाळी 4 वाजता घोषणा केली जाईल असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.