नागपूर : नागपूर, पुणेपाठोपाठ नवी मुंबई राज्यातील तिसरे शहर असणार आहे जिथे महामेट्रोला प्रकल्प संचलनाचे काम सोपवण्यात आलं आहे. त्यामुळं महामेट्रोच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या सिटी अँड इंडस्ट्रिअल डेव्हलमेंट कार्पोरेशनने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोला मार्गिका क्रमांक 1 वर मेट्रो गाडी चालवण्याची जवाबदारी सोपवली आहे.
पुढील 10 वर्षांकरिता महामेट्रोला या मार्गिकेवर मेट्रो चालवण्या संबंधीचं काम मिळालं आहे. याशिवाय याच मार्गिकेवरील उर्वरित कामही महामेट्रोला मिळालं आहे. मुंबई मेट्रोसाठी महामेट्रोची नियुक्ती अगोदरच करण्यात आल्यानंतर परिचालन आणि देखभाल सुविधा पुरवण्यासाठी सिडको कडून महामेट्रोला स्वीकार पत्र देण्यात आलं आहे. महामेट्रो आणि सिडको दरम्यान यासंबंधी करार होणार आहे.
महामेट्रोनं नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचं काम सुमारे 92 टक्के पूर्ण केले असून दोन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु केलेली आहे. उर्वरित दोन मार्गिकेचं काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या खेरीज पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम देखील वेगानं सुरु आहे. तसंच महामेट्रोने डिझाईन केलेल्या नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. याशिवाय महा मेट्रोने ठाणे आणि तेलंगणा राज्यातील वारंगल इथे मेट्रो प्रकल्पाकरता सविस्तर प्रकल्प अहवाल (Detailed Project Report - DPR) तयार केला आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये सिडको आणि महा मेट्रो दरम्यान करार झाल्यावर मार्गिका क्रमांक 1 वरील उर्वरित कामाचं कंत्राट मिळालं होतं. बेलापूर ते पेंढारी स्थानकापर्यंत हि मार्गिका असून या दरम्यान 11 स्थानके आहेत. या मार्गिकेची लांबी 11 किलो मीटर असून यात तळोजा इथे मेंटेनन्स डेपो आहे. पंचानंद आणि खारघर इथे 2 ट्रॅकशन सब-स्टेशन आहेत. या मार्गिकेवरील काम पूर्ण वेगाने सुरु असून ठरवल्या वेळापत्रकाप्रमाणे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.