Mahanagar Gas Reduces Price of CNG: महानगर गॅस लिमिटेडने मुंबईकरांना मध्यरात्री मोठं सप्राइज दिलं. मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यरात्री अचानक सीएनजीचे दर कमी करण्यात आले. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशीरा एमजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये कापत करत असल्याची घोषणा केली. तात्काळ प्रभावाने नवीन दर लागू होतील असंही कंपनीने सांगितलं. नवीन दरानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 2.50 रुपयांनी कमी झाले आहेत.
मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नवीन दरानुसार मुंबईतील सीएनजीचे दर प्रति किलो 73.40 रुपये इतका झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा विचार केल्यास नव्या दरकपातीमुळे सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलपेक्षा 53 टक्के अधिक स्वस्त आहे. सध्याचे मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर मागील अनेक महिन्यांपासून 105 ते 110 रुपयांदरम्यान आहेत.
सीएनजीचे दर कमी झाल्याने वाहतुकीसाठी सीएनजीचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे. प्रामुख्याने वाहनांमधील इंधनासाठी सीएनजीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न म्हणून ही दरकपात करण्यात आल्याची चर्चा आहे. सीएनजी हे इंधन म्हणून पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. भारताला अधिक हरित आणि स्वच्छ बनवण्याच्या उद्देशाने आम्ही सीएनजीचे दर कमी करत असल्याचं महानगर गॅस लिमिटेडने दरकपात करताना जाहीर केलं आहे.
सीएनजी कारची मागणीही मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवेतील बेस्ट आणि टीएमटीसारख्या संस्थाही सीएनजी बसेस चालवतात. देशभरामध्ये सीएनजी कार्स आणि वाहनांचा ट्रेण्ड वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रीक वाहनांऐवजी सीएनजी वाहनांना आजही अधिक पसंती असल्याचं दिसत आहे. सीएनजी वाहनांची किंमत ही पेट्रोल-डिझेल वाहनांच्या रेंजमध्येच असते. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांप्रमाणे सीएनजी वाहने विकत घेणेही फार सहज शक्य आहे. सीएनजी वाहनांचा वापर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये रिक्षा आणि इतर छोट्या आकाराची वाहनेही सीएनजीवरच चालतात.
मुंबईत पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिकच आहेत. पेट्रोलचे आजचे म्हणजेच 6 मार्चचा दर हा 106.31 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर एक लिटर डिझेलसाठी 94.27 रुपये मोजावे लागत आहेत. हे दर मुंबईमधील आहेत.